अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गुरुवारी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह येत असले तरी सध्या समुद्रातून होणाऱ्या बाष्पाच्या पुरवठय़ामुळे त्यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या किमान तापमानात मोठय़ा प्रमाणावर वाढ होऊन सध्या राज्यातील सर्वच भागांतून थंडी गायब झाली आहे. अनेक भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ४ ते ७ अंश सेल्सिअसने वाढले आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ढगाळ स्थिती निर्माण झाली आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून बहुतांश भागांत काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे. पावसाळी स्थिती निवळेपर्यंत तापमानातील वाढ कायम राहणार आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, वर्धा आदी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.