पुण्यात खाद्य पदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या कंपनीच्या दोन डिलिव्हरी बॉयसह त्यांच्या एका मित्रास सोनसाखळी चोरीप्रकरणी आज अटक करण्यात आली आहे. पुणे शहरातील काळेपडळ, चंदननगर परिसरात खाद्य पदार्थ पोहचवण्यासाठी गेलेले दोन डिलिव्हरी बॉय आणि त्यांच्यासोबत असलेला त्यांचा एक मित्र अशा तिघांनी मिळून मंगळसूत्र चोरी केल्याची घटना घडली होती. या तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

आकाश जाधव आणि विजय पोसा, अशी या दोन डिलेव्हरी बॉयचे आणि साहील गायकवाड असे त्यांच्या मित्राचे नाव आहे. हे तिघेही मूळचे सोलापुर येथील आहेत. झोन पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश जाधव आणि विजय पोसा हे मूळचे सोलापूर येथील आहेत. हे दोघे साधारण वर्षभरापासून खाद्य पदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या एका नामांकित कंपनीचे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. दरम्यान, काळे पडळ आणि चंदननगर परिसरात या दोघांना अधिक ऑर्डर मिळत होत्या. त्या परिसरात असलेल्या सोसायटीमध्ये ते नेहमी जात असल्याने, तेथील नागरिकांच्या राहणीमानाची त्या दोघांना माहिती होती. १६ जून रोजी काळेपडळ येथील निर्मल टाऊनशीप येथे एका व्यक्तीने खाद्य पदार्थांची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. तेव्हा आकाश जाधव आणि विजय पोसा हे दोघे गेले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत सोलापूरवरून आलेला साहील गायकवाड हा मित्र देखील होता.

हे तिघे जेव्हा निर्मल टाऊनशीप असलेल्या सोसायटीच्या गेटवर पोहचले. तेव्हा गार्डने केवळ एकालाच आतमध्ये सोडले होते. त्या तिघांपैकी एक जण आत गेला व त्याच दरम्यान गार्ड कामानिमित्त सोसायटीमध्ये गेल्यावर, बाहेर दोघे जण उभे होते. ऑर्डर देऊन एकजण बाहेर येत असताना, भारती विठ्ठल माडळे या लहान मुलीसोबत चालत येत होत्या. त्यावेळी आजूबाजूला कोणीही दिसत नाही हे पाहून त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅमचे मंगळसुत्र हिसकावून त्यापैकी एकाने पळ काढला. तर, बाहेर उभे असलेल्या दोघांनी समोर पळत येत असलेला साथीदार दिसताच गाडी सुरू करून, ते तिघेही तेथून पसार झाले होते.

या घटनेनंतर १९ तारखेला देखील चंदननगर भागातील एका सोसायटीमधील ज्येष्ठ महिलेचे अंदाजे चार ग्रॅमचे मंगळसूत्र अशाच प्रकारे हिसकावून नेण्यात आले होते. काळेपडळ येथील घटनेचा आम्ही तपास सुरू करीत होता. चंदननगरमध्ये देखील अशाच प्रकाराची घटना समोर आल्याने दोन्ही घटनेतील आरोपी एकच असावेत असा अंदाज सुरू होता. आम्हाला जवळपास चारशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या पाहणीद्वारे मूळ आरोपीं पर्यंत पोहोचता आले. यातील आकाश जाधव आणि विजय पोसा या आरोपींचा मित्र साहिल गायकवाड हा सोलापूरवरून पुण्यात १६ तारखेला आला होता. त्याला जिम जॉईन करायची होती. मात्र, त्याच्याकडे पैसे नव्हते. म्हणून त्यांनी त्याच दिवशी पहिली चोरी काळे पडळमध्ये केली. या घटनेनंतर तिघांचा आत्मविश्वास वाढल्याने, त्यांनी पुढे चंदननगर येथे अशाच प्रकाराची चोरी केल्याचे आरोपींने सांगितले आहे.  या दोन्ही घटनेत एकूण २२ ग्राम सोन्याचे १ लाख ९७ हजार रुपये किंमतीचे दोन मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.