पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा सहभाग
शिवाजीनगरमधील सुशीला को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये देखभालीसाठी ठेवलेल्या कर्मचाऱ्याने आठ सदनिका आणि आठ दुकानांची बनावट कादगपत्रे तयार करून बळकवण्याचा डाव उघडकीस आला आहे. महापालिकेच्या मिळकतकर विभागातील दोन कर्मचाऱ्यांना हाताशी धरून मूळ मालकांच्या नोंदी काढत स्वत:च्या नावाच्या नोंदी करण्यात आल्याच्या या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिले आहेत.
शिवाजीनगरमध्ये सुशीला को-ऑपरेटिव्ह सोसायटी असून तेथील आठ सदनिका आणि आठ दुकाने मुंबईत राहणाऱ्या काही जणांनी घेतली होती. या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी त्यांनी एका व्यक्तीची नेमणूक केली होती. नेमलेल्या व्यक्तीने या मिळकतीमधील आठ सदनिका आणि दुकानांची बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानुसार पालिकेच्या मिळकत कर विभागाकडे त्या व्यक्तीने सर्व सदनिका आणि दुकानांवर स्वत:च्या नावाच्या नोंदी करुन घेतल्या. ही माहिती मूळ मालकांना समजली. त्यानंतर त्यांनी या प्रकाराबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती.
या तक्रारीवर महापालिकेच्या विधी विभागाचा अभिप्राय घेण्यात आला होता. विधी विभागाचा आलेला अभिप्राय ग्राहय धरुन या सर्व मालमत्तेवर पुन्हा मूळ मालकांच्या नावाच्या नोंदी करण्यात आला. त्यानुसार मूळ मालकांना मिळकतकराची नोटीस पाठविण्यात आली. मूळ मालकांनी या मिळकतकराचा भरणाही केला होता. त्यावर संबंधित व्यक्तीने पुन्हा मिळकत कर विभागातील दोन कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन पुन्हा आठ सदनिका आणि आठ दुकानाच्या नोंदींवर स्वत:चे नाव लावून घेतले. ही माहिती मूळ मालकांना समजली. त्यावर सर्व मालकांनी उपमहापौर मुकारी अलगुडे यांच्याकडे धाव घेतली. अलगुडे यांनी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप आणि मिळकत कर विभागाचे प्रमुख सुहास मापारी यांना उपमहापौर कार्यालयात बोलवून घेतले. उपमहापौरांनी मिळकत कर विभागातील कर्मचाऱ्यांची सर्वासमोर खरडपट्टी काढली. मिळकत कर विभागाकडून दुसऱ्यांदा हा प्रकार झाल्याचे उपमहापौर अलगुडे
यांनी सांगितले. त्यावर या प्रकरणी तातडीने चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिले.