चालकांच्या अरेरावीकडे कंपन्यांचे दुर्लक्ष

लांबच्या अंतरासाठी रिक्षा चालकांकडून हमखास परतीच्या भाडय़ाची मागणी केली जाते. हाच प्रकार आता कॅब चालकांनीही अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. रिक्षाचालकांबाबतची तक्रार कोणतीही व्यवस्था ऐकून घेत नाही, त्याप्रमाणेच प्रवासाचे भाडे मिळाले की कॅब चालकांच्या तक्रारींबाबतही कंपन्या कानावर हात ठेवत आहेत. त्यामुळे ढिसाळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पर्याय ठरू पाहणाऱ्या ‘कॅब’वरही आता नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

कॅब चालकांच्या विविध भागांमध्ये तयार झालेले गट प्रवाशांवर अरेरावी करत असल्याचे समोर येते आहे. अ‍ॅपवर आधारित कॅब सेवा नागरिकांनी स्वीकारेपर्यंत विविध सुविधा, कडक नियमावली, तक्रारींची दखल अशी चोख सेवा कंपन्यांकडून दिली जात होती. आता मात्र नागरिकांच्या वाढू लागलेल्या तक्रारींकडे कंपन्यांनीही सपशेल दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे.

थोडे लांब जायचे असले की रिक्षा चालक जास्त पैसे किंवा परतीचे भाडे मागणार आणि अडलेल्या प्रवाशांना ते द्यावे लागणार हे पुण्यात वर्षांनुवर्षे चालत आलेले समीकरण आहे. अनेक भागांसाठी मीटर बाजूला ठेवून रिक्षा चालकांनी आपापसातील सामंजस्याने एकरकमी भाडे ठरवूनही ठेवलेले असते. तोच प्रकार आता कॅबबाबतही सुरू झाला आहे.

ज्या ठिकाणी प्रवाशाला जायचे असते, तेथून कॅबचालकाला दुसरी ट्रिप मिळते. त्यामुळे कॅबची नोंदणी करताना मागणी आणि पुरवठय़ाच्या गणितानुसार समोर आलेले भाडेच कॅब चालकाने घेणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात मात्र या व्यतिरिक्त आणखी पैशांची मागणी चालकांकडून करण्यात येते.

प्रवाशाने भाडे कबूल केले नाही तर अध्र्या रस्त्यातच चालक ट्रिप थांबवतात किंवा रद्द करून टाकतात. स्टेशन, विमानतळ या ठिकाणी हा प्रकार सर्रास घडतो. प्रवास सुरू केला की काही अंतरावर जाऊन परतीच्या भाडय़ाची मागणी चालकांकडून केली जाते. ती मान्य केली नाही, तर चालक ट्रिप रद्द करतात आणि गाडी बिघडल्याचे कारण देत कंपनीकडून आकारण्यात येणाऱ्या दंडातूनही सुटका मिळवतात. त्यानंतर प्रवाशाला पुन्हा नव्याने कॅबसाठी नोंदणी करावी लागते.

अगदी नेहमीपेक्षा चौपट किंवा सहापट भाडे असतानाही परतीच्या भाडय़ाची मागणी करण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांच्या तक्रारी बेदखल

रिक्षा चालकांच्या अरेरावी विरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रवाशांना जागाच नाही. मात्र आता तीच गत कॅबच्या बाबतही होऊ लागली आहे. चालकांच्या अरेरावीमुळे मनस्ताप झाला तरी किमान त्याची तक्रार कंपनीकडे करता येऊ शकते, हा दिलासा प्रवाशांना सुरुवातीच्या काळात मिळत होता. आता मात्र कंपन्यांकडूनही तक्ररींची दखल घेण्यात येत नसल्याची तक्रार आहे. कॅबबाबत किंवा प्रवासाबाबत तक्रार करण्यासाठी काही पर्याय कंपन्याकडून देण्यात आले आहेत. त्याच चौकटीत तक्रार केल्यास काही वेळा कॅब रद्द झाल्यामुळे आकारण्यात आलेल्या दंडापासून सुटका होते. मात्र त्यापलिकडे काही समस्या असल्यास ई-मेल करावा लागतो. तो मिळाल्याची पोहोचही कंपनीकडून मिळते. मात्र पुढे त्या तक्रारींचे काहीच होत नाही असा अनुभव प्रवाशांनी सांगितला.

मी फग्र्युसन रस्त्यावरून बाणेर भागात जाण्यासाठी १ ऑगस्टला उबरकडे कॅबची मागणी केली. मला चालक आणि वाहनाचे तपशीलही मिळाले. चालकाने त्याला जेथून मला निघायचे होते तो पत्ता सापडत नसल्याचे सांगितले. पत्ता नकाशावर योग्यप्रकारे दिसत होता. मी पत्ता समजावून सांगितला. मात्र तरीही पत्ता सापडत नसल्याचे सांगितले. त्यानंतर चालकाचा फोन बंदच लागत होता. मला नाइलाजाने ट्रिप रद्द करावी लागली आणि त्याचा दंड मला कंपनीने आकारला. त्याबाबत मी उबरकडे तक्रारही केली. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही किंवा दंडाचे पैसेही मला परत मिळाले नाहीत. चालकांना जीपीएसवरील नकाशे कळत नाहीत किंवा त्यावर नेमकी ठिकाणे दिसत नसल्याचाही अनुभव अनेक वेळा आला आहे.

प्रभा जोशी, प्रवासी

तुमच्या तक्रारींसाठी..

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही, रिक्षाचालकांची अरेरावी या सगळ्याला वैतागून प्रसंगी थोडा अधिक खर्च करून नागरिकांनी ओला, उबेर या कॅबची सुविधा स्वीकारली. मात्र आता या सुविधेमध्येही बनवाबनवीचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्याचे अनुभवही अनेकांना येत आहेत. त्याबाबत काही मत मांडायचे असल्यास ‘लोकसत्ता’चे व्यासपीठ खुले आहे. याबाबत तुमचा अनुभव किंवा मत तुम्ही मेल किंवा व्हॉट्स अ‍ॅप करू शकता. व्हॉट्स अ‍ॅपवर संदेश पाठवताना शक्यतो आपले नाव टाका.

  • मेल अ‍ॅड्रेस – lokpune4@gmail.com
  • व्हॉट्स अ‍ॅप करण्यासाठी क्रमांक – ९८२२३२९९३२
  • पत्रव्यवहारासाठी पत्ता- दै. लोकसत्ता, एक्सप्रेस हाउस, शिरोळे रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ४११००४