पुढील विधानसभा निवडणुकीनंतर आमदारांचे अधिक मोठे संख्याबळ घेऊन एकवीरा देवीच्या दर्शनाला येईन, अशी भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली. शिवसेनेच्या नवनिर्वाचित ६३ आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कार्ला येथील एकवीरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी ही भावना व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना दुसऱया क्रमांकावरील पक्ष ठरला आहे. पक्षाचे ६३ उमेदवार निवडणुकीत विजयी झाले. भाजपसोबत राज्यातील सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेची बोलणी सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर कुलदैवताचा आशीर्वाद घेण्यासाठी उद्धव ठाकरे आमदारांसोबत कार्ल्याला आले होते. यावेळी त्यांनी सपत्नीक एकवीरा देवीची पूजा केली. पुढील निवडणुकीनंतर अधिक मोठे संख्याबळ घेऊन देवीच्या दर्शनाला येईन, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सत्तेत सहभागी होण्याबाबत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे पक्षाचे नेते आणि खासदार अनिल देसाई यांनी यावेळी सांगितले.
भाजपशी युती असताना शिवसेनेने पहिल्यांदा १९९५ च्या निवडणुकीत राज्यात सत्ता मिळवल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचे मंत्री आणि आमदारांना घेऊन एकवीरा देवीचे दर्शन घेतले होते. त्याच प्रथेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आमदारांसह देवीचे दर्शन घेतले.