13 December 2017

News Flash

महापालिका म्हणते, शहरात ९३ अनधिकृत होर्डिग!

होर्डिग्ज, फलक उभारताना महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाची मान्यता घेणे बंधनकारक आहे.

प्रतिनिधी, पुणे | Updated: June 20, 2017 2:50 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

शहरातील प्रत्येक चौकात, गल्लीबोळात फ्लेक्स, होर्डिग्ज, बॅनर्स जागोजागी झळकत असताना आणि ते सर्व अनधिकृत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले असतानाही महापालिकेच्या नोंदीनुसार शहरातील अनधिकृत होर्डिग्ज, फ्लेक्सची संख्या अवघी ९३ अशी आहे. महापालिकेने लेखी स्वरूपात हे उत्तर दिले असून २ हजार ८८ अधिकृत होर्डिग्जची संख्या असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे स्वतंत्र यंत्रणा असूनही या ९३ अनधिकृत होर्डिग्जवर महापालिकेला कारवाई करता आलेली नाही.

होर्डिग्ज, फलक उभारताना महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाची मान्यता घेणे बंधनकारक आहे. मात्र ही परवानगी न घेताच शहरात सर्वत्र होर्डिग्ज उभारले जातात. महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना तसेच क्षेत्रीय स्तरावर ही कारवाई करण्यात येते. अभिनंदनाचे, निवड-नियुक्तीचे होर्डिग्ज सध्या शहराच्या सर्वच भागात आहेत. यात नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून उभारण्यात येणारे होर्डिग्ज, फ्लेक्स, बॅनर्सचे प्रमाणही मोठे आहे. त्याबाबत शहरातील स्वयंसेवी संस्था आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीही सातत्याने आवाज उठविला आहे. शहराचे मोठय़ा प्रमाणावर विद्रूपीकरण होत असताना महापालिकेच्या आकडेवारीनुसार मात्र शहरात अनधिकृत होर्डिग्जच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील अधिकृत, अनधिकृत होर्डिग्जची संख्या, त्या ठिकाणांची यादी, कारवाई करण्यात आली असल्यास त्याचा तपशील, त्याद्वारे मिळालेले उत्पन्न अशी लेखी विचारणा नगरसेवक युवराज बेलदरे यांनी आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडे केली आहे. त्याला दिलेल्या उत्तरामध्ये २ हजार ८८ अधिकृत होर्डिग्ज असून ९३ अनधिकृत होर्डिग्ज असल्याची माहिती दिली गेली आहे.

शहरातील अनधिकृत होर्डिग्ज्, फ्लेक्स, फलकांचा प्रश्न गंभीर झाला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही त्याबाबत सातत्याने चर्चा झाली आहे. तसेच मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत होर्डिग्ज उभारण्यात येत असल्याचा आणि प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. दरम्यान, एप्रिल २०१५ ते मार्च २०१७ या कालावधीतील कारवाईची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या कालावधीत एकूण ४ लाख ८३ हजार १४२ अनधिकृत होर्डिग्ज, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, किऑक्सवर कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्या तुलनेत दाखल गुन्ह्य़ाचे प्रमाणही अत्यंत नगण्य असून अवघ्या ११५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील ९३ अनधिकृत होर्डिग्जपैकी सर्वाधिक होर्डिग्ज हे ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आहेत. त्यांची संख्या २८ अशी आहे. तर भवानी पेठ, टिळक रस्ता, वारजे-कर्वेनगर, बिबवेवाडी या शहरातील मध्यवर्ती भागात एकही अनधिकृत होर्डिग्ज नाही. औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत चार, घोले रस्ता येते सात, कोथरूड येथे चार, येरवडा येथे बारा, कसबा-विश्रामबाग वाडा येथे चार, हडपसर येथे आठ, धनकवडी येथे चार तर कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये १४ अनधिकृत होíडंग्ज आहेत. महापालिकेच्या विषय समित्या आणि प्रभाग समित्या अध्यक्षपदांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. या निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे फ्लेक्स, बॅनर्स प्रभागात बहुतेक ठिकाणी लागले आहेत, हे विशेष.

First Published on June 20, 2017 2:50 am

Web Title: unauthorized hoardings in pune