आयोगाकडून काही परीक्षांमध्ये बदल

पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत या साखळीतच वर्षभर अडकलेल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आता थोडासा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काही पदांसाठी एकत्रित परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी या पदांसाठी पूर्वपरीक्षा एकच असणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी भरती परीक्षा घेतल्या जातात. अनेक पदांच्या परीक्षांचे अभ्यासक्रम, पद्धती एकच असूनही वेगवगळ्या परीक्षा घेण्यात येत होत्या. यातील बहुतेक साऱ्या परीक्षा देण्यासाठी धडपड करणाऱ्या उमेदवारांना बहुतेक वेळा दर काही दिवसांनी एखादी परीक्षा देण्याची वेळ येत होती. त्याचप्रमाणे एवढय़ा परीक्षांच्या वेळापत्रकांचे नियोजन करणे आणि त्याची व्यवस्था करणे यामध्ये आयोगावरील कामाचा ताण वाढला होता. या पाश्र्वभूमीवर काही परीक्षा एकत्र घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. पुढील वर्षी (२०१७) होणाऱ्या परीक्षांपासून हे बदल लागू होणार आहेत.

लिपिक आणि टंकलेखकांसाठी दोन टप्प्यांत परीक्षा

लिपिक आणि टंकलेखक पदासाठी मोठय़ा प्रमाणावर अर्ज येत असल्यामुळे आता या पदासाठीही पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा असे दोन टप्पे उमेदवारांना पार करावे लागणार आहेत. कर सहायक आणि पोलीस निरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षेसाठीही मुख्यपरीक्षा ठेवण्यात येणार आहे.

काय बदल होणार?

‘अ’ गटातील पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी या पदांसाठीची पूर्वपरीक्षा एकत्रित असणार आहे. या परीक्षेच्या जाहिरातीत प्रत्येक पदासाठीची वर्गनिहाय संख्या जाहीर करण्यात येईल. पूर्वपरीक्षेचा अर्ज भरताना कोणत्या पदासाठी परीक्षा द्यायची आहे त्याचा उल्लेख उमेदवाराने अर्जात करायचा आहे. त्यानुसार प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल. पूर्व परीक्षेतून पात्र ठरलेले विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसू शकतील. मुख्य परीक्षा स्वतंत्र राहणार आहे. अभियांत्रिकी सेवेतील स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी, विद्युत आणि यांत्रिकी या पदांसाठीही स्वतंत्र परीक्षा घेण्यात येत होती. मात्र या पदांचीही पूर्वपरीक्षा एकत्रित आणि मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहे.