23 November 2017

News Flash

पुण्यात आणखी एक गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

‘प्रत्यारोपणामुळे या रुग्णालाही ‘इम्यूनोसप्रेसंट’ औषधांचा डोस घ्यावा लागणार आहे.

प्रतिनिधी, पुणे | Updated: May 20, 2017 3:31 AM

पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालय

बडोद्याच्या रुग्ण महिलेवर आईच्या गर्भाशयाचे प्रत्यारोपण

आईच्या गर्भाशयाचे मुलीच्या शरीरात प्रत्यारोपण करण्याच्या गुरूवारी झालेल्या एका शस्त्रक्रियेनंतर तशीच आणखी एक शस्त्रक्रिया पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात शुक्रवारी करण्यात आली. शुक्रवारी झालेल्या शस्त्रक्रियेत गुजरातमधील २३ वर्षांच्या मुलीला तिच्या ४२ वर्षांच्या आईने गर्भाशय दान केले. या आई व मुलीची प्रकृती ठीक असून त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली.

रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर, हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजीव जाधव यांच्यासह डॉक्टरांच्या चमूने ही शस्त्रक्रिया केली. बडोद्याहून प्रत्यारोपणासाठी आलेल्या महिलेस ‘अशरमॅन्स सिंड्रोम’ नावाचा आजार होता.

या आजारात रुग्णाला गर्भाशय असते, परंतु त्याच्या आतील आवरण नसते. तिला यापूर्वी गर्भधारणा झाली होती, परंतु गर्भपात झाले होते. शुक्रवारच्या शस्त्रक्रियेस गुरूवारच्या शस्त्रक्रियेपेक्षा कमी वेळ लागला असून दुपारी दोन वाजता शस्त्रक्रिया सुरू झाली आणि रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी संपली.

‘प्रत्यारोपणामुळे या रुग्णालाही ‘इम्यूनोसप्रेसंट’ औषधांचा डोस घ्यावा लागणार आहे. हा डोस कमी झाल्यानंतर- साधारणत:  एक वर्षांने तिला गर्भधारणा होऊ शकेल. तिच्या स्त्रीबिजापासून प्रयोगशाळेत भ्रूण तयार करून गोठवून ठेवण्यात आले असून ते योग्य वेळी तिच्या गर्भाशयात सोडण्यात येतील,’ अशी माहिती शस्त्रक्रियेत सहभागी असलेले स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पंकज कुलकणी यांनी दिली. गुरूवारी गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आलेल्या मुलीला आधी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, परंतु आता ती द्रवपदार्थ घेऊ लागली आहे, तसेच तिला गर्भाशय दिलेल्या तिच्या आईस रुग्णकक्षात हलवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

दोन्ही शस्त्रक्रियांमध्ये दाता महिलेच्या शरीरातून दुर्बिणीचा वापर करून गर्भाशय काढून घेण्यात आले. ‘यात गर्भाशयाला जोडलेल्या सूक्ष्म रक्तवाहिन्या व्यवस्थित वेगळ्या करता येतात आणि प्रत्यारोपण करताना त्याचा फायदा होतो. यात महिलेच्या पोटावर छोटा छेद दिला जातो आणि विशेष चिरफाड केली जात नाही. यामुळे गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेचा वेळ, तसेच शस्त्रक्रियेवेळी होणारा रक्तस्त्राव व गुंतागुंत कमी होते,’ अशी माहिती डॉ. पुणतांबेकर यांनी दिली.

First Published on May 20, 2017 3:31 am

Web Title: uterine implant surgery in pune