पुणे : लस निर्मिती ही कौशल्याधारित प्रक्रिया असून एका रात्रीत लसउत्पादन वाढवता येत नसते, असे पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.

देशात १८-४४ वयोगटासाठी लसीकरणास सुरुवात झाल्याने लशींची मागणी वाढली आहे. याबाबत सध्या लंडनमध्ये असलेल्या पूनावाला यांनी म्हटले आहे, की दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता लशींचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न आमची कंपनी करीत आहे. पुढील काही महिन्यांत ११ कोटी लशी सरकारला देण्यात येणार आहेत. माझ्या काही वक्तव्यांचे चुकीचे अर्थ काढले गेले असून त्यावर स्पष्टीकरण करणे महत्त्वाचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे लसीकरण ही कौशल्याधारित प्रक्रिया असल्याने एका रात्रीत उत्पादन वाढवणे शक्य होणार नाही. भारताच्या प्रचंड लोकसंख्येचाही विचार करायला हवा. सर्व प्रौढांसाठी कमी काळात लस मात्रा तयार करणे सोपे काम नाही. अनेक प्रगत देशांतही कंपन्या उत्पादन वाढवण्यासाठी धडपड करीत आहेत, तुलनेने त्या देशांची लोकसंख्या आपल्यापेक्षा खूप कमी आहे. आम्ही गेल्या एप्रिलपासून सरकारशी सामंजस्याने काम करीत आहोत. आम्हाला वैज्ञानिक, नियामक व आर्थिक अशा सर्व प्रकारचा पाठिंबा मिळाला आहे, असे पूनावाला यांनी म्हटले आहे.

‘सीरम’ला सरकारकडून १७३२.५ कोटी रुपये

आम्हाला १०० टक्के अग्रिम रकमेपोटी भारत सरकारकडून १७३२.५ कोटी रुपये मिळाले आहेत, असे अदर पूनावाला यांनी स्पष्ट केले. आजपर्यंत आमच्याकडे २६ कोटी मात्रांची मागणी नोंदवण्यात आली, त्यातील १५ कोटी मात्रा आम्ही वितरित केल्या आहेत. अकरा कोटी मात्रा येत्या काही महिन्यांत केंद्राला देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.