वारी या महाराष्ट्रातील चैतन्य प्रवाहाचे रूप आणि त्याच्या सजग अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या चित्रांचा-प्रतिमांचा-शिल्पांचा आणि शब्दांतून अभिव्यक्त होणाऱ्यांचा मेळा जमणार आहे. ‘वारी आनंदयात्रा’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून गुरुवारपासून (१६ जुलै) पुणेकरांना विविध कलाप्रकारांची अनोखी मेजवानी अनुभवता येणार आहे.
‘वारी आनंदयात्रा’ उपक्रमातून लाखो वारकऱ्यांना दृश्यरूप दंडवत घालण्याचा आम्हा कलाकारांचा प्रयत्न आहे. यामध्ये शरद कापूसकर, स्वाती कापूसकर, आर. बी. होले, सचिन निंबाळकर, राही कदम, संदीप सोनावणे, ऋचा कुलकर्णी, अबीर पटवर्धन, माधुरी काथे, मकरंद जाधव, प्रमोद चिकमणी, राहुल वाघ, गोिवद डुंबरे, संजय टिक्कल, नवनाथ क्षीरसागर, महेश निरंतरे, पांडुरंग ताठे, नितीन हडप, भास्कर हांडे, संतोष क्षीरसागर, जयंत जोशी आणि संदेश भंडारे या कलाकारांच्या चित्रांचा-प्रतिमांचा आणि शिल्पांचा समावेश असलेल्या कला-गजराची नांदी गुरुवारी सकाळी दहा वाजता अतुल पेठे दिग्दर्शित ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ या महाराष्ट्र अंनिसच्या लोकरंगमंचच्या रिंगणनाटय़ाने होणार आहे. ज्येष्ठ भाषाअभ्यासक डॉ. गणेश देवी यांच्या बीजभाषणाने प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. बालगंधर्व कलादालन येथे रविवापर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
‘नामा म्हणे’ हा अभंगगायनाचा कार्यक्रम शुक्रवारी (१७ जुलै) प्रसिद्ध गायिका अंजली मालकर सादर करणार असून गजानन परांजपे वाचिक अभिनयाचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. शाहीर संभाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (१८ जुलै) होणाऱ्या कविसंमेलनात श्रीधर नांदेडकर, नारायण लाळे, अजय कांडर, अंजली कुलकर्णी, सुजाता महाजन, रवी कोरडे, शर्मिष्ठा भोसले, प्रशांत चव्हाण आणि नितीन केळकर यांचा सहभाग आहे. सहभागी कलावंतांशी मुक्त संवादाने रविवारी (१९ जुलै) या कला गजराची सांगता होणार आहे.