डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात येणारा ‘वसंतोत्सव’ यंदा १७ ते १९ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची माहिती वसंतरावांचे नातू आणि गायक राहुल देशपांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी मराठे ज्वेलर्सचे भागीदार मिलिंद मराठे व वास्तुशोध प्रोजेक्टसचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कुलकर्णी उपस्थित होते.
वसंतोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रमणबाग शाळेच्या मैदानावर सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होणार आहे. १७ जानेवारी रोजी छत्तीसगडमधील ‘पांडवानी’ या पारंपरिक कलेच्या वारसदार तीजनबाई या महाभारतातील कथानाटय़ सादर करणार आहेत. त्यानंतरच्या सत्रामध्ये राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन होईल. १८ जानेवारी रोजी प्रख्यात कलाकार कौशिकी चक्रवर्ती आणि तबलावादक विजय घाटे यांचे सादरीकरण होणार आहे. तसेच सतारवादक निलाद्री कुमार आणि प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी हे आपली कला सादर करतील. शेवटच्या दिवशी ग्रॅमी पुरस्कार विजेते विक्कु विनायक्रम यांचे विशेष सादरीकरण होणार असून वसंतोत्सवाची सांगता अभिजित पोहनकर, स्वप्निल बांदोडकर आणि राहुल देशपांडे यांच्या गायनाने होईल.
या वर्षीचा ‘वसंतराव देशपांडे स्मृती सन्मान’ कथक नृत्यांगना रोशन दाते आणि संगीत तज्ज्ञ दीपकराजा यांना देण्यात येणार आहे. तसेच ‘वसंतराव देशपांडे उदयोन्मुख कलाकार पुरस्कार’ युवा शास्त्रीय गायक लतेश पिंपळखरे यांना देण्यात येणार आहे.

वसंतोत्सवाची तिकीट विक्री बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, टिळक स्मारक मंदिर आणि शिरीष ट्रेडर्स येथे आजपासून (बुधवार) सुरू होणार आहे. याशिवाय घरपोच तिकिटांसाठी रसिकांनी ०२०-६५२९४२११ या क्रमांकावर सकाळी १० ते ६ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.