जैवविविधतेने नटलेले विविध प्रकल्प; संकल्पचित्र महापालिकेला सादर, ९२ कोटींचा खर्च अपेक्षित
तळजाई टेकडीवरील तब्बल १०७ एकर जागेवर ‘वसुंधरा जैववैविध्य उद्यान’ साकारण्याची योजना तयार करण्यात आली असून त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा आणि संकल्पचित्र शुक्रवारी (२३ डिसेंबर) महापालिकेला सादर करण्यात येणार आहे. या वसुंधरा उद्यानासाठी ९२ कोटींचा खर्च अपेक्षित असून पुढील तीन वर्षांत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जैववैविध्य उद्यान, निसर्गभ्रमण, नक्षत्र उद्यान, रानमेवा उद्यान, पक्षी उद्यान, देशी वृक्षांची लागवड व संगोपन, सेंद्रिय शेती प्रकल्प, साहसी खेळ केंद्र, महिलांसाठी स्वतंत्र क्रीडा केंद्र, सौर ऊर्जा निर्मिती केंद्र आदी अनेकविध वैशिष्टय़ांनी हे वसुंधरा उद्यान नटणार आहे.
तळजाई टेकडीवरील १०७ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली असून सध्या या जागेवर उद्यानाचे आरक्षण आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांत या जागेचा एकात्मिक विकास आराखडा तयार न झाल्यामुळे संपूर्ण जागेचा वापर होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. ही उणीव लक्षात घेऊन पुणेकरांना निसर्गाचे महत्त्व लक्षात आणून देणारा हा भव्य प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. स्थानिक नगरसेवक आणि माजी उपमहापौर यांच्या संकल्पनेतून जैववैविध्य उद्यानाची (बायो डायव्हर्सिटी पार्क- बीडीपी) आखणी करण्यात आली असून हा संपूर्ण आराखडा प्रसिद्ध वास्तुविशारद, लॅँडस्केप डिझायनर महेश नामपूरकर तसेच नागरी नियोजन तज्ज्ञ अभिजित कोंढाळकर, वास्तुविशारद हेमंत बागूल आणि पर्यावरणतज्ज्ञ सचिन पुणेकर यांनी तयार केला आहे.
सध्या या जागेवर काही प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली असली, तरी मोठे क्षेत्र पडून आहे. या सर्व जागेचा अत्यंत बारकाईने विचार करून उद्यानाचा विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. तळजाई टेकडीवरील वन उद्यानात वन्य जीवांचा अधिवास असून अनेक दुर्मीळ वनस्पतीही या भागात आहेत. या सर्व वनस्पतींचे जतन तसेच मोठय़ा प्रमाणावर देशी वृक्षांची लागवड हे या उद्यानाचे वैशिष्टय़ असेल. या उद्यानाच्या संपूर्ण भागात वाहनांना बंदी असेल. तसेच ज्यांना उद्यानापर्यंत जाण्यासाठी वाहन आवश्यक असेल, त्यांच्यासाठी ई-रिक्षांचा पर्याय उपलब्ध असेल. पार्किंगच्या ठिकाणीच सौर ऊर्जा निर्मितीचे केंद्र प्रस्तावित करण्यात आले असून त्याद्वारे तयार होणारी वीज या संपूर्ण प्रकल्पासाठी वापरली जाईल, अशी माहिती आबा बागूल यांनी दिली. नामपूरकर यांना या क्षेत्रातील कामाचा मोठा अनुभव असून त्यांनी तसेच कोंढाळकर, बागूल यांनी अभ्यास करून हा आराखडा तयार केला आहे.
या संपूर्ण जागेपैकी केवळ एक टक्का एवढय़ाच जागेवर एका शाळेचे बांधकाम प्रस्तावित असून उर्वरित सर्व जागा हरित असेल. छोटी छोटी तळी, दगडी रस्ते, छोटी क्रीडांगणे, सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी खुले व्यासपीठ, बगिचांमध्ये वाचनालये, महिलांसाठी स्वतंत्र क्रीडा संकुल अशा अनेकविध गोष्टींमुळे हे उद्यान पुणेकरांचे आकर्षण ठरेल. महिला व युवतींसाठी स्वतंत्र क्रीडा संकुल, खुल्या प्रदर्शनांसाठी जागा, रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीला चालना देणारा प्रकल्प, शेतीमध्ये उत्पादित झालेल्या मालाची विक्री करण्यासाठी शेतीबाजार यांचेही नियोजन असून त्या बरोबरच गावजत्रा, मार्गदर्शकाबरोबर पर्यटन अशाही संकल्पना राबवल्या जाणार आहेत. साहसी खेळांच्याही सुविधा येथे उपलब्ध असतील तसेच निसर्ग इतिहास संग्रहालयही आराखडय़ात प्रस्तावित आहे.
किती एकरांवर काय ?
५५ एकर – जैववैविध्य उद्यान
१४ एकर – क्रीडा क्षेत्र
११ एकर- शैक्षणिक क्षेत्र ११
२७ एकर – अन्य सुविधा
