इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) अशा अभियांत्रिकी संस्थांतील प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या जेईई मेन्स या प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. पुण्याचा वेदांग असगांवकरने ९९.९९ पर्सेटाइलसह राज्यात पहिला क्रमांक मिळवला. तर देशभरातील एकूण ९ विद्यार्थ्यांना १०० पर्सेटाइल गुण मिळाले आहेत, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) देण्यात आली.

एनटीएकडून जेईई मेन्स आणि जेईई अ‍ॅडव्हान्स्ड या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. त्यात जेईई मेन्स हा पहिला टप्पा असतो. या परीक्षेत उत्तम गुण मिळवणारे विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र ठरतात. जेईई मेन्स ७ ते ९ जानेवारीदरम्यान देशभरातील २३३ शहरांमध्ये घेण्यात आली. ८ लाख ६९ हजार १० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेत १०० पर्सेटाइल गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे प्रत्येकी दोन, दिल्ली, गुजरात, हरियाणाच्या प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, जानेवारीमध्ये झालेल्या परीक्षेनंतर आता एप्रिलच्या जेईई मेन्सची नोंदणी सुरू होणार आहे. त्यासाठी ७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ही परीक्षा ५ ते ११ एप्रिल या कालावधीत वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे.

जेईई मेन्समध्ये ९९.९९ पर्सेटाइल मिळाल्याने खूप आनंद झाला. मेन्ससाठी कसून तयारी केली होती, पण राज्यात पहिला येईन असे वाटले नव्हते. आता बारावीच्या परीक्षेची आणि जेईई अ‍ॅडव्हान्सची तयारी सुरू केली आहे. आयआयटीमध्ये प्रवेश घ्यायची इच्छा आहे. जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये किती गुण मिळतील त्यावर कोणत्या आयआयटीची निवड करायची याचा विचार करता येईल.

– वेदांग असगांवकर