वेदाचार्य घैसास गुरूजी वेदपाठशाळेचे वेदभवन रौप्य महोत्सवामध्ये पदार्पण करत असून त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच शास्त्रीय संगीत महोत्सव, रक्तदान शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यातील घैसास गुरूजी वेदपाठशाळेच्या वेदभवनची स्थापना १५ ऑक्टोबर १९८९ रोजी झाली. वेदभवन यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षांत पदार्पण करणार असून त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रौप्य महोत्सवी वर्ष कार्यक्रमाचे उद्घाटन गुरूवारी (७ नोव्हेंबर) सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी विष्णूमहाराज पारनेरकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत महोत्सवाचे उद्घाटन गुरूवारी ज्येष्ठ सनई वादक प्रमोद गायकवाड यांच्या सनई वादनाने होणार आहे. या महोत्सवामध्ये शौनक अभिषेकी, पं. व्यंकटेशकुमार यांच्या गायनासह प्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार, बासरीवादक राकेश चौरसिया यांचे बासरी वादन होणार आहे. याशिवाय रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त प्रत्येक वेदाची २५ पारायणे होणार आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये सात दिवस हा उपक्रम होणार आहे. त्याचबरोबर या कालावधीमध्ये अतिरूद्र, सहस्त्रचंडी, भागवत सप्ताह, वेदसंमेलन, नारदीय आणि वारकरी कीर्तन सप्ताह, प्रवचने आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. १७ नोव्हेंबरला दीपोत्सवाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.
वेदपाठशाळेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा वेदमहर्षी विनायकभट्ट घैसास गुरूजी सरस्वती उपासना पुरस्कार यावर्षी कर्नाटकमधील ‘वेदविद्या गुरूकुल’ या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या हस्ते १३ नोव्हेंबरला पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.