भोसरीत आज राष्ट्रवादीचा मेळावा

पिंपरी : अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे शिरूर लोकसभेची राजकीय समीकरणे बदलली आहेत. माजी आमदार विलास लांडे यांना निवडणूक लढण्यासाठी तयारी करण्याचे आदेश राष्ट्रवादीने दिलेले असतानाच डॉ. कोल्हे यांच्या प्रवेशानंतर लगेचच त्यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा राष्ट्रवादीत सुरू झाली, त्यामुळे लांडे समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मुंबईत डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून डॉ. कोल्हे यांच्या शिरूरच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. समाजमाध्यमांवर तशा पध्दतीचे संदेश काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात फिरू लागले. त्यामुळे लांडे समर्थकांमध्ये चलबिचल सुरू झाली.

शिरूरमधून लढण्यासाठी राष्ट्रवादीकडून कोणी तयार नव्हते, तेव्हा विलास लांडे यांना बोलावून घेत लढण्याची तयारी करा, असे आदेश पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले होते. त्यानुसार, लांडे, त्यांचे कार्यकर्ते तसेच लांडे यांचे नातेगोते प्रचारात पूर्ण ताकदीने उतरले होते. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि डॉ. कोल्हे यांची बारामतीत भेट झाली. त्यांच्यातील चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. डॉ. कोल्हे मूळचे शिरूर मतदारसंघातील नारायणगावातील आहेत. त्यामुळे त्यांच्या शिरूरच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली. त्यामुळे प्रचारात बरेच पुढे गेलेल्या लांडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीत असंतोषाचे वारे वाहू लागले आहेत. डॉ. कोल्हे यांनी पक्ष देईल, तो आदेश मान्य राहील, असे विधान केले असून पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे लांडे यांनी म्हटले आहे.

संभ्रमावस्था दूर होणार का?

राष्ट्रवादीत उमेदवारीवरून संभ्रमावस्था असतानाच शिरूरच्या तयारीसाठी भोसरीत पक्षाचा मेळावा आयोजित करण्याच्या सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांना दिल्या. त्यानुसार, मंगळवारी भोसरीत होणाऱ्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांची उपस्थिती मेळाव्याचे मुख्य आकर्षण राहणार आहे. मेळाव्याच्या निमित्ताने उमेदवारीवरून निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर होणार का, असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या चर्चेत आहे.