विनय सहस्रबुद्धे यांचे मत

लोकहिताची कळवळ असलेली माणसे सत्तेवर आल्यामुळे जनतेला तत्पर सेवा मिळत आहे. भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक कारभार आणि ‘आम्ही हे करू शकतो’ हा सामान्य माणसाला आलेला आत्मविश्वास हे मोदी सरकारचे यश आहे. ६० वर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे प्रयत्न सुरू असून सुशासन आणि लोकहिताला प्राधान्य देत मोदींनी देशाच्या विकासाचे ध्येय ठेवले आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

शहर भाजपतर्फे ‘समृद्ध भारत, समर्थ भारत : मोदी सरकारची दोन वर्षे’ या विषयावर सहस्रबुद्धे यांचे व्याख्यान झाले. पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार विजय काळे या वेळी उपस्थित होते.

सहस्रबुद्धे म्हणाले,‘‘आसाममध्ये भाजपचा झालेला विजय हे मतदारांनी काँग्रेसच्या मतपेढीच्या राजकारणाला दिलेले उत्तर आहे. राष्ट्रवाद ही भाजपची विचारधारा आहे. शेजारी राष्ट्रांशी संबंध चांगले असावेत यादृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच परराष्ट्र धोरणाची देशाच्या विकासाशी सांगड घातली गेली आहे. लोकानुरंजनाकडे पाठ आणि लोकहिताला प्राधान्य हे सरकारचे धोरण आहे. रोजगारामध्ये कौशल्य विकासाला महत्त्व दिले आहे. लोकहिताची कामे करण्यासाठी लोकसंवाद आवश्यक आहे. त्यातूनच ‘मन की बात’ सुरू झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधतात.’’  ‘‘दोन वर्षांत भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण आले नाही. घोटाळेमुक्त कारभारामुळे जनतेमध्ये समाधान असल्याचे सांगून सहस्रबुद्धे म्हणाले, पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर १ कोटी २ लाख लोकांनी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे अनुदान परत केले. त्यामुळे गोरगरिबांच्या घरामध्ये चुलीची जागा गॅसने घेतली. भ्रामक धर्मनिरपेक्षतेसह सर्व आव्हाने पेलण्याचे सामथ्र्य असलेला नेता देशाला लाभला आहे. मोदी सरकारच्या कारभारामुळे सामाजिक आणि आर्थिक विकासाची आकांक्षा निर्माण झाली. ‘आम्ही हे करू शकतो’ हा आत्मविश्वास सामान्य माणसांना आला.’’ योगेश गोगावले यांनी प्रास्ताविक केले. गणेश घोष यांनी आभार मानले.