पुण्यात होणार्‍या मराठा विचार मंथन बैठकीसाठी उदयनराजे येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. पण या बैठकीला का आले नाहीत माहिती नसल्याचे शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी सांगितले. मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्याप्रकरणी राज्यातील मराठा समाजात संतापाची लाट असून त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मराठा क्रांती समन्वयक पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर आज पुण्यात शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा विचार मंथन बैठकीला सुरुवात झाली.

या बैठकीला राज्यातील अनेक नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना स्वतः विनायक मेटे यांनी निमंत्रण दिले होते. यामुळे या बैठकीकडे लक्ष लागून होते. मात्र या दोन्ही नेत्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली असून त्याचाच धागा पकडून, मेटे त्यांच्या भाषणात म्हणाले की, उदयनराजे, शिवेंद्रराजे यांना या बैठकीसाठी निमंत्रण दिलं होते.

उदयनराजे मला येतो म्हणाले होते. पण ते का आले नाहीत माहिती नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी समाजाच्या व्यासपीठावर येण्याची विनंती करतो, ज्याला नेता व्हायचं त्यानं नेता व्हावे. पण निदान एका दिशेनं तर राहा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ते पुढे म्हणाले की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत एमपीएससी परिक्षा पुढे ढकलण्याची विनंती मी शरद पवारांना करीत असून आता जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत एमपीएससी परिक्षा पुढे ढकलण्याची विनंती देखील मी शरद पवारांना करीत आहे. कारण हे सरकार शरद पवारांचा शब्द खाली पडू देत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.