शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा

इतिहासाच्या पुस्तकातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची ओळख करून दिली जाते. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाविषयीचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी केली. हा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासंबंधी शालेय अभ्यासक्रम मंडळाला सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. श्री क्षेत्र वढू-तुळापूर येथे संभाजी राजांच्या जीवनावर आधारित एक भव्य संग्रहालय उभारण्याची संकल्पना विचाराधीन आहे तसेच या स्थळाला शासकीय मानवंदना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असेही ते म्हणाले.

पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती आणि श्री क्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात तावडे बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार बाबुराव पाचर्णे, तुळापूरचे सरपंच गणेश पुजारी, वढू बुद्रुकच्या सरपंच रेखा शिवले, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, वर्षां विनोद तावडे या वेळी उपस्थित होत्या.

तावडे म्हणाले, संभाजीराजांचे कर्तृत्व, समाज आणि धर्मासाठी दिलेले बलिदान संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे. त्यांचे कार्य आणि बलिदान नव्या पिढीला समजण्यासाठी राजांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल. श्री क्षेत्र वढू—तुळापूर येथे संभाजीराजांचे संग्रहालय उभारण्यासह शासकीय मानवंदना आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू.

तावडे दाम्पत्याच्या हस्ते संभाजी महाराजांच्या समाधीची विधिवत पूजा करून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना तावडे यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तीर्थक्षेत्र व्हावे

शिरूर : संभाजी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त सकाळी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात आमदार पाचर्णे म्हणाले, इंद्रायणी—भीमेच्या तीरावर वढू तुळापूर असे एकत्रित तीर्थक्षेत्र व्हावे. या दोन गावांना जोडण्यासाठी पूल व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संभाजी राजांना शासकीय मानवंदना देण्यासाठी पाठपुरावा करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या मागण्या लवकरच मान्य होतील. संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. संभाजी महाराजांची समाधी व त्यांचा इतिहास सर्वाना पाहता यावा यासाठी संग्रहालय उभारावे, अशी मागणी तुळापूरचे सरपंच गणेश पुजारी यांनी या वेळी केली.