‘साहित्य संमेलनासाठी देणग्या मिळतात, अनुदान मिळते, तरीही आपल्याला सगळे फुकट का हवे असते?’ असा सवाल सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनीच साहित्य महामंडळाला केला आहे. घुमान येथील साहित्य संमेलनाचे प्रक्षेपण दूरचित्रवाहिन्यांवर मोफत करण्यात यावे, अशी मागणी साहित्य महामंडळाने केली होती. त्या संदर्भात तावडे यांनी महामंडळाला फटकारले आहे.
घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेनलाचे प्रक्षेपण खासगी आणि शासकीय वाहिन्यांवर मोफत करण्यात यावे, अशी मागणी साहित्य महामंडळाकडून करण्यात आली होती. त्याबाबत तावडे यांना महामंडळाकडून निवेदन देण्यात आले होते. मोफत प्रक्षेपणाच्या मुद्दय़ावरून तावडे यांनी महामंडळाला फटकारले आहे. संमेलनाचे मोफत प्रक्षेपण होणे शक्य नसल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
याबाबत माध्यमांशी बोलताना तावडे म्हणाले, ‘घुमान येथील साहित्य संमेलनाचे प्रक्षेपण करण्यासाठी वाहिन्यांनी काही रक्कम मागितली आहे. साहित्य संमेलनासाठी महामंडळाला देणग्या मिळतात. शासनाकडूनही अनुदान दिले जाते. असे असतानाही, आपल्याला सगळे फुकट का हवे असते?’’