लांबलचक ‘रोल्स रॉईस’पासून रुपेरी पडद्यावरच्या ताऱ्यांची आठवण करुन देणाऱ्या ‘इम्पाला’पर्यंत आणि 15car1डौलदार राजहंसाच्या चिन्हाने लक्ष वेधून घेणाऱ्या ‘पॅकार्ड’पासून पिटुकल्या ‘मॉरिस मायनर’पर्यंतच्या जुन्या मोटारींनी मोटारप्रेमींच्या मनाचा ठाव घेतला. निमित्त होते ‘विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया’तर्फे (व्हीसीसीसीआय) खराडीत आयोजित करण्यात आलेल्या विंटेज कार रॅलीचे.
तब्बल ९० जुन्या मोटारी आणि मोटारसायकली या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. पुण्याबरोबरच पुण्याबाहेरुनही विंटेज मोटारी जमवणारी मंडळी मोठय़ा संख्येने या रॅलीसाठी आली होती. यातील कित्येक जण तर मुंबईहून या मोटारी चालवत घेऊन आले होते. आलिशान ‘रोल्स रॉईस’ची विविध मॉडेल्स या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरली. नेहमी लोकप्रिय ठरणाऱ्या काळ्या रंगासह ऑलिव्ह, मोरपंखी, मरुन आणि दुधी रंगांच्या रोल्स रॉईस मोटारींनी रॅली गाजवली.
फेरीत सहभागी झालेल्या मोटारी आणि मोटारसायकलींना बक्षिसेही देण्यात आली. यात योहान पूनावाला यांच्या संग्रहातील सहा मोटारींनी बक्षिसे पटकावली. अमीर अली जेठा यांची ‘रोल्स रॉईस पी- ११’ आणि होर्मुझ सोराबजी यांच्या रोल्स रॉईसनेही बक्षीस मिळवले.
लहान आकाराच्या सुबक ‘मॉरिस मायनर’ मोटारींनीही चाहत्यांकडून कॅमेऱ्यांच्या ‘क्लिकक्लिकाटा’ची सलामी मिळवली. दुसऱ्या जागतिक युद्धात वापरली गेलेली ‘विलिस’ जीप, आकर्षक केशरी रंगात सजलेली ‘हडसन ग्रेट’, लांबडी ‘डॉज किंग्जले’, छोटी ‘राईली’ या मोटारींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. जुन्या आणि काहीशा चपटय़ा आकाराच्या ‘मर्सिडीज बेंझ’, दोनच व्यक्ती बसू शकतील अशी चकचकीत ‘फेरारी’, ‘जॅग्वार’ आणि जगाचे आकर्षण ठरलेली ‘लंडन टॅक्सी’ यांनीही मोटारप्रेमींची वाहवा मिळवली. ‘व्हेस्पा’, ‘लँब्रेटा’, ‘विजय सुपर’ या स्कूटर आणि ‘राजपूत’, ‘ट्रायम्फ’, ‘बीएसए’, ‘रॉयल एन्फिल्ड’ या मोटारसायकलीही रॅलीत दिमाखात धावल्या.