News Flash

गाणं आलं तरच व्हायोलिनमधून प्रकटते!

अनेक गुरुजनांचे आशीर्वाद लाभलेले माझे जीवन ही आनंदयात्रा झाली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पं. अतुलकुमार उपाध्ये

प्रसिद्ध व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांचे मत

कोणत्याही वाद्यावर प्रभुत्व संपादन करायचे असेल तर आधी गाणं आलंच पाहिजे. आतमध्ये गाणं असेल तरच ते व्हायोलिनमधून सुरांच्या माध्यमातून प्रकटते. व्हायोलिन कोणीही वाजवू शकेल, पण गाणं आलं तर ते वादन गायल्यासारखे वाटेल, असे मत प्रसिद्ध व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी व्यक्त केले. अनेक गुरुजनांचे आशीर्वाद लाभलेले माझे जीवन ही आनंदयात्रा झाली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

वयाच्या चौथ्या वर्षांपासून व्हायोलिन हातामध्ये घेतलेले पं. उपाध्ये गुरुवारी (२९ जून) वयाची साठ वर्षे पूर्ण करीत आहेत. साठ वर्षे म्हणजे काही फार नाहीत. आता कुठे सुरुवात होत आहे, असे उपाध्ये यांनी सांगितले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्हायोलिन अ‍ॅकॅडमीतर्फे गुरुवारपासून चार दिवसांच्या ‘स्वरमल्हार’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.   वडील बा. शं. उपाध्ये हे माझे व्हायोलिनवादनातील गुरु. त्यांनी गाणं शिकल्याशिवाय व्हायोलिन हाती घ्यायचे नाही असे सांगितले. त्यामुळे अगदी गायक नसलो तरी माझे सुरांचे ज्ञान पक्के झाले. पं. एम. एम. गोपालकृष्णन, येहूदी मेन्युहिन आणि श्रीधर पार्सेकर यांना व्हायोलिनवादनामध्ये मी आदर्श मानतो. पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. कुमार गंधर्व, डॉ. वसंतराव देशपांडे, किशोरी आमोणकर अशा दिग्गज कलाकारांचे आशीर्वाद लाभले आणि त्यांचे संस्कार माझ्यावर झाले. हे दिग्गज कलाकार आपल्यात नसले तरी त्यांनी आपल्या नाममुद्रेसह स्वरमंदिरे उभी केली आहेत, असे उपाध्ये यांनी सांगितले. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात १९८८ मध्ये पं. भीमसेन जोशी यांनी दिलेली व्हायोलिनवादनाची संधी ही माझ्या आयुष्याची दिशा बदलणारी ठरली. त्यापूर्वी इतक्या मोठय़ा समुदायासमोर कधी वादन केले नव्हते. या मैफिलीने मला आत्मविश्वास दिला. सतारवादक उस्ताद शाहीद परवेज, बासरीवादक पं. रोणू मुजुमदार, सनईवादक दया शंकर, सारंगीवादक उस्ताद दिलशाद खाँ, सरोदवादक पं. तेजेंद्र मुजुमदार या कलाकारांसमवेत व्हायोलिनची जुगलबंदी केली आहे. व्हायोलिन अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून नव्या पिढीचे कलाकार घडविण्याबरोबरच देशभरातील २५ शहरांत स्वरझंकार महोत्सवाचे आयोजन केले जाते, असेही उपाध्ये यांनी सांगितले.

स्वरमल्हार महोत्सवातील कार्यक्रम

गुरुवार २९ जून (सायंकाळी ५.३०)

  • तेजस-राजस उपाध्ये (व्हायोलिनवादन), राहुल शर्मा (संतूरवादन), शौनक अभिषेकी-आनंद भाटे (गायन)

शुक्रवार ३० जून (सायंकाळी ५.३०)

  • पं. तेजेंद्र मुजुमदार (सरोद) आणि संजीव अभ्यंकर (गायन), उपाध्ये व्हायोलिन वादन विद्यालयातील विद्यार्थ्यांचे समूहवादन, बेगम परवीन सुलताना (गायन)

शनिवार १ जुलै (सकाळी ९) मंजूषा पाटील (गायन)

  • आरती अंकलीकर-टिकेकर (गायन), उस्ताद रशीद खाँ (गायन)
  • (स्थळ- तीन दिवस गणेश कला क्रीडा मंच)

रविवार २ जुलै (स्थळ- टिळक स्मारक मंदिर) (सकाळी ९)

  • राकेश चौरासिया, विजय घाटे, जिनो बँक्स, शेल्डन डिसिल्व्हा, संगीत हळदीपूर, संजय दास, पं. विश्वमोहन भट्ट (मोहनवीणा वादन)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 4:38 am

Web Title: violinist atulkumar upadhye
Next Stories
1 ‘स्वाभिमानी’च्या सदाभाऊंचं काय करायचं?, ४ जणांची समिती करणार फैसला
2 पुण्यात एसटी-टेम्पोचा अपघात; बस चालक गंभीर जखमी
3 प्रेयसीने भावाच्या साथीने केला प्रियकराचा खून