महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळाला ‘व्हायरस’ चा फटका बसल्याने राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बसलेल्या सर्व उमेदवारांची माहिती परीक्षेच्या तोंडावरच नष्ट झाली आहे. उमेदवारांना त्यांची माहिती पुन्हा भरण्याची सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली असून, त्यासाठी केवळ दोनच दिवसांची मुदत देण्यात आल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या तयारीऐवजी पुन्हा माहिती भरण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. नाहीतर, दुसरा उपाय म्हणून परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर जाऊन अर्जाच्या गठ्ठय़ामधून आपला अर्ज शोधण्याचा अव्यवहार्य उपाय आयोगाने उमेदवारांपुढे ठेवला आहे.
लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी यावर्षी साधारण साडेतीन लाख उमेदवार बसले आहेत. ही परीक्षा ७ एप्रिलला होणार आहे. मात्र, ‘व्हायरस’मुळे आयोगाच्या संकेतस्थळावरील विद्यार्थ्यांची सर्व माहिती गेल्यामुळे ही माहिती पुन्हा भरण्याची सूचना आयोगाने विद्यार्थ्यांना केली आहे. उमेदवारांनी ४ एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व माहिती भरावी अन्यथा उमेदवारांना परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात येणार नाही, असे सूचनापत्र आयोगाने काढले आहे. मात्र, पुन्हा सर्व माहिती भरताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. माहिती भरत असताना अॅप्लिकेशन अॅड्रेस विचारण्यात येत आहे. मात्र, ज्या उमेदवारांनी ऑनलाईन शुल्क भरले आहे, त्यांच्याकडे अॅप्लिकेशन अॅड्रेस नसल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना माहिती भरता येणे शक्य नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तर नेट कॅफे शोधून पुन्हा सर्व माहिती भरण्याचा खटाटोप करावा लागणार आहे. यावर्षी प्रथमच नवीन परीक्षा पद्धतीला सामोरे जायचे असल्यामुळे आधीपासूनच तणावाखाली असलेल्या उमेदवारांना परीक्षा तोंडावर आलेली असताना आपली माहिती भरण्यासाठी सतत क्रॅश होणाऱ्या संकतस्थळाबरोबर झटापट करावी लागणार आहे. या परिस्थितीवर उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर येऊन अर्जाच्या प्रतीमधून आपला अर्ज शोधावा आणि ओळख पटवून परीक्षेला बसावे असा अव्यवहार्य पर्याय आयोगाने विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. मात्र, आयोगाने परीक्षा ठरल्यावेळीच होईल अशी भूमिका घेतली आहे.
उमेदवारांनी जायचे कोणत्या केंद्रावर?
ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र मिळणार नाही, त्यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन तेथील अर्जामधून आपला अर्ज शोधावा असा पर्याय आयोगाने समोर ठेवला आहे. मात्र, मुळात परीक्षेचे प्रवेश पत्रच नसल्यामुळे उमेदवारांना त्यांच्या केंद्राची माहिती मिळणे शक्य नाही. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्या केंद्रावर जायचे आणि अर्ज शोधायचा कसा, असा पश्न उपस्थित होत आहे.