News Flash

दृष्टिहीन विद्यार्थी आता ‘स्वलेखना’द्वारे स्वतंत्र

निवांत अंध मुक्त विकासालय संस्थेबरोबर जोश सॉफ्टवेअर कंपनीने ‘स्वलेखन’ हे अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे

वीस शाळांमध्ये अ‍ॅपचा वापर सुरू

संगणकाच्या की-बोर्डवरून बोटे फिरवून दृष्टिहीन विद्यार्थी आता ‘स्वलेखना’चा आनंद लुटत स्वतंत्र होत आहेत. तंत्रज्ञानाचा नावीन्यपूर्ण आविष्कार असलेल्या अ‍ॅपचा राज्यातील वीस शाळांमध्ये वापर सुरू झाला असून राज्यभरातील सुमारे सहाशे विद्यार्थी या अ‍ॅपच्या मदतीने टायपिंगचे धडे घेत आहेत. २०२० मध्ये राज्यभरातील एक हजार दृष्टिहीन विद्यार्थ्यांना स्वलेखनाचा परिचय करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे वार्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका ते लेखनिकाशिवाय देऊ शकतील.

निवांत अंध मुक्त विकासालय संस्थेबरोबर जोश सॉफ्टवेअर कंपनीने ‘स्वलेखन’ हे अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. यामुळे परीक्षेमध्ये उत्तरे लिहिण्यासाठी दृष्टिहीन विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱ्या लेखनिकांची गरज संपुष्टात येईल आणि हे विद्यार्थी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्वतंत्र होतील. कल्पक ब्रेल पेपर आच्छादनाचा वापर करून की-बोर्डवरील कीज शिकण्यापासून ते ७८ हून अधिक कल्पक आणि संवादात्मक धडे ऐकण्यापर्यंत सर्व माध्यमे वापरून ‘स्वलेखन’ दृष्टिहीन व्यक्तींना स्वयंपूर्ण करते. हे अ‍ॅप्लिकेशन बहुतांश मानवी आवाजाच्या मार्गदर्शनावर चालते. त्याला काही ठिकाणी टेक्ट-टू-स्पीच या साहाय्याची जोड दिली जाते.

निवांत संस्थेच्या विश्वस्त उमा बडवे म्हणाल्या,की आमची संस्था गेल्या २२ वर्षांपासून दहावी उत्तीर्ण झालेल्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांसमवेत काम करत आहे. परीक्षा देताना लेखनिकांवर अवलंबून राहावे लागत असल्याची तक्रार हे विद्यार्थी करत होते. म्हणून आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना स्वलेखनाद्वारे ती क्षमता मिळवून देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना मराठीत लिहिण्याची क्षमता हवी असते.

हे स्वयंअध्ययनाचे टायिपग टय़ूटर आहे. आम्ही दृष्टिहीन शिक्षकांचे एक पथक या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पाठवतो. ते विद्यार्थ्यांना मराठी टायपिंग शिकण्यासाठी उत्तेजन देतात. ब्रेल की-बोर्डचा वापरही अध्ययन साहित्य म्हणून केला जातो. त्याद्वारे ते सामान्य की-बोर्डकडे सहज जाऊ शकतात.

अ‍ॅप उपयोगी

अकरावीची परीक्षा सुरू असताना लेखनिकाने मध्येच उत्तरपत्रिका लिहिण्यास नकार दिला होता. त्यामुळे मी नाऊमेद झाले होते. विचार करणे आणि उत्तरे सांगणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करताना समस्या येतात. लेखनिक संथ गतीने लिहिणारा असेल तर अडचणी येतात. अ‍ॅप संवादात्मक असून यातील धडे एमपी थ्रीवर रेकॉर्ड केले जाऊ शकतात. त्यामुळे ते समजण्यास सोपे आहे, असे मोनिका रणदिवे म्हणाली.

हे अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यासाठी आम्हाला तीन वर्षे लागली. मात्र, संपूर्ण ऑडिओ कंटेंटची निर्मिती निवांत संस्थेने केली आहे. त्यांनी सर्व धडय़ांचे ध्वनिमुद्रण केले. प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याच्या किंवा तिच्या गतीने शिकता यावे या उद्देशातून हे अ‍ॅप विकसित करताना सातत्याने चाचण्या घेतल्या गेल्या. हे अ‍ॅप दृष्टिहीन मुलांच्या प्रगतीमध्ये मदत करेल.- गौतम रेगे, सहसंस्थापक, जोश सॉफ्टवेअर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 1:46 am

Web Title: visually impaired students twenty schools continue to use the app independent by handwriting akp 94
Next Stories
1 २५ वर्षांपासूनचा मित्रपक्ष बाजूला झाल्याने, चंद्रकांत पाटील यांना दुःख : अजित पवार
2 संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, परंतु सरकार तीन पक्षांच आहे : अजित पवार
3 पुणे – यशवंतराव चव्हाण रुग्णालयात होणारी लेखी परीक्षा रद्द, परीक्षार्थींचा गोंधळ
Just Now!
X