चिंचवड, पिंपरी आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ मिळून एक लाख ३८ हजार मतदार वगळण्यात आले आहेत. मयत, दुबार आणि स्थलांतरित झालेली ही नावे मूळ मतदार यादीत वगळण्यात आली आहेत. दरम्यान, आगामी २०१७ च्या पालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर याद्यांमधील दुरुस्त्या तसेच नवमतदार नोंदणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
पिंपरी पालिकेचे सहआयुक्त दिलीप गावडे, करसंकलन विभागाचे प्रमुख भानुदास गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जानेवारी २०१५ मध्ये चिंचवड मतदारसंघाचे चार लाख ८७ हजार मतदार होते. त्यातील मयत, दुबार व स्थलांतरित असे एकूण ८१ हजार मतदार वगळण्यात आले. तसेच, पिंपरीच्या तीन लाख ८२ हजार मतदारांमधून ४२ हजार मतदार वगळण्यात आले. त्याच पध्दतीने, भोसरीतील तीन लाख ६७ हजार मतदारांपैकी ४२ हजार मतदार वगळण्यात आले आहेत. राज्यभरातील मतदारसंख्येनुसार चिंचवड हा सर्वाधिक मतदारसंख्या असलेला मतदारसंघ होता. आता, चिंचवडमधून ८१ हजार मतदार वगळण्यात आल्याने हा देखील एकप्रकारचा विक्रम असल्याची टपिंणी यावेळी करण्यात आली.
२०१७ च्या निवडणुकांसाठी मतदार यादीचे पुनर्निरीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आठ ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर दरम्यान मतदार नोंदणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, एक जानेवारी २०१६ मध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. मतदार यादीतील नावे, पत्त्यांमधील बदल व दुरुस्ती करण्यात येणार असून दुबार, मयत व स्थलांतरित नावे वगळण्याची कार्यवाही या कालावधीत होणार आहे. चिंचवड मतदारसंघासाठी थेरगावच्या पालिका शाळेत, पिंपरीसाठी प्राधिकरणात डॉ. हेडगेवार भवनात तर भोसरीसाठी नेहरुनगरमध्ये मगर स्टेडियम येथे मतदार नोंदणी अधिकारी उपलब्ध असणार आहेत. नागरिकांनी तसेच नवमतदारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त राजीव जाधव यांनी केले आहे.
आधार कार्डची सक्ती नाही
फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी जानेवारी २०१६ मध्ये असणारी मतदार यादी अंतिम मानली जाणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. मतदान करताना जन्मतारीख व रहिवासी दाखला आवश्यक ठरवला जाणार असून आधार कार्डची सक्ती केली जाणार नाही.