राज्यामध्ये झालेल्या गारपिटीमुळे आडसाली उसाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. २५ ते ३० टक्के आडसाली ऊस गारपिटीच्या माऱ्याने उद्ध्वस्त झाला असून साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, असे आवाहन वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटने (व्हीएसआय) केले आहे. हा कुजलेला ऊस गाळपासाठी न देता चाऱ्यासाठी वापरावा, असेही सुचविले आहे.
राज्यात गारपीट झाल्यामुळे उसाच्या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पुणे, सोलापूर, सांगली, नगर आणि नाशिक या जिल्ह्य़ामध्ये आडसाली उसाची मोठय़ा प्रमाणावर हानी झाली असल्याची माहिती व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी रविवारी दिली. कृषी शास्त्रज्ञ डी. बी. फोंडे, तुकाराम पाटील, अशोक निकम या वेळी उपस्थित होते.
व्हीएसआयने गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शास्त्रज्ञांचा सहभाग असलेली चार पथके पाठविली होती. बारामती, इंदापूर, दौंड, माढा, अक्कलकोट, माळशिरस, कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगाव, नेवासा, राहुरी या भागात नुकसानीचे प्रमाण सर्वाधिक आहे. वादळीवाऱ्यासह झालेल्या गारपिटीने काही भागात एक ते दोन फूट जाडीचा गारांचा थर साचला होता. शेतकऱ्यांनी या पथकाला दिलेल्या माहितीच्या आधारे व्हीएसआयने काही उपाययोजना सुचविल्या आहेत. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी आवश्यक कीटकनाशके किंवा रोख रकमेच्या माध्यमातून तातडीने मदत करावी, असे आवाहन करण्यात आले असून ही रक्कम त्याला देण्यात येणाऱ्या बिलातून वगळून घ्यावी, असेही सुचविण्यात आले आहे.
देशमुख म्हणाले, सुरू आणि खोडवा पिकाचे नुकसान झाले असेल तरी पिकाची कापणी करू नये. थोडय़ाफार प्रमाणात उसास इजा झाल्यामुळे पुढील नुकसान टाळण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करावी. खोड किडीचे नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकाचा वापर करावा. पोंगा कुजलेला नाही अशा पिकास नेहमीच्या खतमात्रा शिफारसीप्रमाणे द्याव्यात. तसेच एकरी ५० गॅ्रम जादा नत्र द्यावे. नवीन पाने बाहेर पडल्यानंतर द्रवरूप मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी. ज्या ठिकाणी उसाचे पोंगे जास्त कुजलेले आहेत त्या पिकाची जमिनीलगत तोडणी करणे आवश्यक आहे. सर्वच ठिकाणी पोंगे जिवंत असल्यास पिकाची कापणी करण्याची गरज नाही. गारपीटग्रस्त उसाची तोडणी झाल्यानंतर खोडवा पिकाची ज्या पद्धतीने जोपासना केली जाते त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात.