पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात काम करणारा वार्डबॉय आणि सुरक्षा रक्षक असलेल्या महिलेकडून कोविडवर परिणामकारक ठरणारे इंजेक्शन रेमडेसिवीर चढ्या दराने विकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुस्तफा अब्दुल गफार तांबोळी यांनी निगडी पोलिसांत तक्रार अर्ज दिला असून संबंधित व्यक्तींवर आणि रुग्णालयावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. त्यानुसार निगडी पोलीस चौकशी करत असून यात महिला सुरक्षा रक्षक वैष्णवी टाकुरकर, वॉर्डबॉय शाहिद शेख आणि विजय रांजणे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अर्जदार मुस्तफा यांची आई मुमताज अब्दुल गफार तांबोळी यांना करोनाची बाधा झाल्याने आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन डॉ. अमित वाघ यांनी आणण्यास सांगितले होते. अगोदर दोन इंजेक्शन्स मेडिकलमध्ये उपलब्ध झाली. त्यानंतर, मुमताज यांची प्रकृती खालावल्याने त्यांना डॉक्टरांनी आणखी इंजेक्शन्स आणण्यास सांगितले. मात्र, इंजेक्शन्सचा तुटवडा असल्याने ते उपलब्ध झाले नाही.

दरम्यान, मुस्तफा यांची आई दाखल असलेल्या आयसीयू वॉर्डातील वॉर्डबॉय शाहिद शेख याच्याकडे इंजेक्शन्स कुठे मिळतील असे विचारले असता. इंजेक्शन्स मिळतील मात्र दोन इंजेक्शन्साठी १५ हजार ६०० रुपये मोजावे लागतील असे सांगत बॅगेतून इंजेक्शन्स काढून मुस्तफा यांना दिले. यावेळी डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी देखील फाडून टाकण्यात आली. परंतु, अर्जदार मुस्तफा यांच्या आईचा उपचारादरम्यान दोन दिवसांनी मृत्यू झाला. हा सर्व प्रकार ऑगस्ट महिन्याच्या १८ ते २४ तारखेदरम्यान घडला.

त्यानंतर, मुस्तफा यांच्या मित्राच्या वडिलांवर भोसरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेव्हा, देखील रेमडेसिवीर इंजेक्शन आवश्यक होतं. मुस्तफा यांनी वॉर्डबॉय शाहिद शेखला फोन करून इंजेक्शन मिळतील का? असं विचारल्यानंतर उपलब्ध होतील असे सांगत रुग्णालयाची सुरक्षा रक्षक महिला वैष्णवी टाकूरकर आणि वॉर्डबॉय विजय रांजणे यांच्यासह भेटले. त्यानंतर मुस्तफा आणि इंजेक्शन हवे असलेले मित्र त्या ठिकाणी इंजेक्शन्स घेण्यासाठी गेले. तेव्हा, त्यांनी ६ हजार रुपयांना इंजेक्शन्स विकताना त्यांना पकडले. यांपैकी, विजय रांजणे हा पळून गेला. मात्र, पोलिसांनी या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून चौकशीअंती गुन्हा दाखल केला जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवादवाड यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितलं.

तक्रारदारावरच ५ कोटींची दावा ठोकणार – डॉ. अमित वाघ

दरम्यान, स्टार हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित वाघ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून रुग्णालयात असा प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे. तसेच, संबंधित वॉर्डबॉय आणि सुरक्षा रक्षक महिलेला कामावरून काढत असल्याचंही त्यांनी सांगितलं. रुग्णालयात ही घटना घडलेली नाही. पोलिसांनी चौकशी करावी आणि या घटनेत दोषी असलेल्यांवर कारवाई करावी. रुग्णालयाचा यात काहीही संबंध नाही, असं असताना ज्याने तक्रार दिली आहे त्याच्यावर ५ कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे डॉ. अमित वाघ यांनी सांगितले.