शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला लवकरच सुरुवात होत असून त्यासाठीची कृती योजना निश्चित करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामांवरील कारवाई आणि अशी बांधकामे होत असल्यास ती थांबवण्यासाठी प्रत्येक प्रभागात एक अधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा विषय मध्यंतरी निवडणूक आचारसंहिता आणि अन्य कारणांमुळे मनुष्यबळ नसल्यामुळे थांबला होता. मात्र आता कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक प्रभागात एका अधिकाऱ्याची नियुक्ती याच कामासाठी करण्यात आली आहे. हा अधिकारी पदनिर्देशित असेल. प्रत्येक प्रभागासाठी नियुक्त करण्यात आलेल्या या स्वतंत्र अधिकाऱ्याने फक्त अनधिकृत बांधकामांवरील कारवाई आणि अशी बांधकामे होत असल्यास ती थांबवणे हेच काम त्याच्या प्रभागात करायचे आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
अनधिकृत बांधकामांवर कारवाईला प्राधान्य दिले जाईल. कोणत्या प्रभागात कोणत्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाले आहे याची यादी तयार करण्यात आली असून त्यानुसार कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.