महाराष्ट्रावर पाण्याचे मोठे संकट असून येथे पाण्याचा व्यवस्थित उपयोग होत नाही. जलसाक्षरतेची गरज असताना त्याविषयी उदासीनता दिसून येते. दुष्काळामुळे वाईट दिवसांचे सावट असलेल्या महाराष्ट्रात पाण्याचे योग्य व्यवस्थापन व पाण्याचा व्यवस्थित वापर न झाल्यास निश्चितपणे ‘बुरे दिन’ येतील, असे मत ‘जलबिरादरी’ चे प्रमुख डॉ. राजेंद्रसिंह यांनी भोसरीत बोलताना व्यक्त केले. पॅकेजमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नसल्याचे सांगून तीन वर्षांनंतर महाराष्ट्रावर प्रदूषणाचे मोठे संकट येईल व ते हाताळणे अवघड होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
मराठी पत्रकार परिषदेच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ‘मी मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक तुळशीदास भोईटे, निमंत्रक एस. एम. देशमुख सहभागी झाले होते. डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले,‘महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट आहे. भारतात सर्वात जास्त पाण्यावर खर्च करणारे राज्य महाराष्ट्र आहे. ४० टक्के धरणे महाराष्ट्रात आहेत. दिल्लीतील सत्ता कायम महाराष्ट्राच्या मुठीत होती म्हणूनच हे शक्य झाले. तरीही आजमितीला राज्यात सर्वात मोठे संकट पाण्याचे आहे. त्यासाठी जिथे-जिथे पाण्याचे संकट आहे, तिथे जलसाक्षरता मोहीम सुरू करण्याची गरज आहे. अभियंते व ठेकेदार त्यांना पैसा मिळेल अशाप्रकारे प्रकल्प अहवाल तयार करतात. त्यातून जलसंधारणावरील खर्च वायाच जातो आहे.’
चर्चासत्रापूर्वी ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर यांची ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. ‘माध्यमांना सामाजिक जबाबदारीचे विस्मरण झालंय काय?’ या विषयावर परिसंवाद झाला. ‘पुण्यनगरी’च्या संपादक राही भिडे, शिवसेनेच्या प्रवक्तया डॉ. नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, भाजपचे केशव उपाध्ये, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, उल्का महाजन यांनी सहभाग घेतला. ‘सोशल मीडियामुळे प्रसार माध्यमांचे महत्त्व कमी झाले आहे का?’ या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे, समीरण वाळवेकर, संजय भुस्कुटे, साहिल जोशी, प्रसन्न जोशी, जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गणेश मुळे सहभागी झाले होते

सोशल मीडियासाठी कडक कायदे हवेत- डॉ. सदानंद मोरे
अलीकडे सोशल मीडियाचा भलताच प्रभाव वाढला आहे. मुद्रित व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर जबाबदारी असते, कायद्याचा धाक असतो. तसे काही सोशल मीडियासाठी नाही. त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही. कोणी काहीही लिहितो. दुसऱ्याची बदनामी करण्यात आनंद मानला जातो. तंत्रज्ञानामुळे या प्रकाराला प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यांना शिस्त लावली पाहिजे, त्यांच्यासाठी कायदे झाले पाहिजेत. शासनाने व तज्ज्ञांनी मिळून मोकाट सुटलेल्या या माध्यमाची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असे मत डॉ. सदानंद मोरे यांनी समारोपप्रसंगी बोलताना व्यक्त केले.