पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणीसाठा लक्षात घेता जून २०१९ पर्यँत शहरात दररोज पाच तास पाणी पुरवठा केला जाणार आहे. अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे महानगरपालिकेच्या काल झालेल्या मुख्य सभेत प्रशासनाकडून दिवाळीनंतर एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यावर आज महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली पाणी नियोजना बाबत बैठक पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव आणि सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.

शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय झाला होता. दिवाळीनंतर शहरात दिवसातून एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी महापालिकेच्या मुख्य सभेत दिली होती. पाणीकपातीच्या या निर्णयाची अंमलबजावणी दिवाळीनंतर होणार असल्याचे सांगण्यात आले होते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणात यंदा गेल्या वर्षीपेक्षा पाणीसाठा कमी असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ामध्ये कपात करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र जूनपर्यंत शहराला पुरेसा पाणीपुरवठा केला जाईल असे आज जाहीर करण्यात आले.

यावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, शहराला पाच तास पाणीपुरवठा केला जाणार म्हणून पाणी कपात केली नाही. जास्त दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. पाणी नियोजनाचे वेळापत्रक येत्या दोन दिवसात जाहीर केले जाणार आहे. तसेच पाच तास पाणी पुरवठ्याची अंमलबजावणी सोमवारपासून होणार असल्याचेही त्या म्हणाल्या. शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी घेण्यात येते. या पाण्यात कपात करून प्रतिदिन ११५० दशलक्ष लिटर पाणी घेण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली आहे.