काम असमाधानकारक – महापौर

पिंपरी : शहरातील जलपर्णीची समस्या पूर्णपणे निकाली निघाली नसतानाच, जलपर्णी काढण्याच्या कामांची तब्बल सव्वापाच कोटींची देयके मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आली आहेत. सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या जलपर्णीच्या कामांविषयी महापौर माई ढोरे यांनीही संशय व्यक्त केला आहे. जलपर्णी काढण्याची कामे व्यवस्थित झाली नसल्याने  ठेकेदारांची देयके देऊ नयेत, अशी स्पष्ट सूचना महापौरांनी आयुक्त राजेश पाटील यांना केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पाच महिन्यांपासून शहरवासीयांना जलपर्णीची समस्या भेडसावते आहे. अधिकारी, लोकप्रतिनिधी व ठेकेदारांचे साटेलोटे असल्याने वेळेत जलपर्णी काढली जात नाही. पाऊस सुरू होईपर्यंत जलपर्णी काढल्याचे वरवर दाखवले जाते. पावसाच्या पाण्याने जलपर्णी वाहून गेल्यानंतर या कामांची देयके मंजूर करून घेतली जातात. नंतर, यातील लाभार्थी पैसे वाटून घेतात, अशीच पद्धत वर्षानुवर्षे अवलंबली जाते. यंदाही तशीच संशयास्पद परिस्थिती होती. महापौरांच्या आरोपपत्रामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

जलपर्णी काढण्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांची सव्वापाच कोटींची देयके मंजुरीचा विषय स्थायी समितीच्या ९ जूनच्या बैठकीत होता, तो तहकूब ठेवण्यात आला. जलपर्णी काढण्याच्या कामासाठी सुरुवातीला असलेल्या ठेकेदाराला सव्वाकोटी रुपये देण्यात येणार आहेत. नंतरच्या कामांसाठी स्वतंत्रपणे चार कोटी मंजूर करण्यात आले. सर्व मिळून सव्वापाच कोटी खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. तरतूद कमी पडल्याने आरोग्य विभागाच्या ‘यांत्रिक पध्दतीने साफसफाई’ या लेखाशीर्षावरील तीन कोटी रुपये जलपर्णीसाठी वळवण्यात आले आहेत.  कामचुकार ठेकेदाराची देयके देण्यात येऊ नयेत. जलपर्णीचे काम पूर्ण झाले नसताना त्याची देयके मंजुरीसाठी कशी आली, कामाच्या प्रमाणातच देयके द्यावीत, असे मुद्दे स्थायी समिती सदस्यांनी बैठकीत मांडले. त्यापाठोपाठ महापौरांनीही या कामातील हलगर्जीपणावर बोट ठेवले असून देयके देण्यास विरोध दर्शवला आहे. आरोग्य विभागाने मात्र याविषयी पूर्णपणे मौन बाळगले आहे.

पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पात्रात बेसुमार जलपर्णी वाढलेली आहे. प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडण्यात येणारे सांडपाणी जलपर्णीसाठी पोषक ठरते. जलपर्णीमुळे शहरवासीयांना डास आणि कीटकांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. जलपर्णी काढण्याचे काम ठेकेदारांनी निर्धारित मुदतीत केले नाही. कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्यांचा हलगर्जीपणा दिसून आला. जलपर्णी वाहून जाण्यासाठी ते पावसाच्या पाण्याची वाट पाहत आहेत, असे निदर्शनास आले. जलपर्णी काढण्याचे काम व्यवस्थित झाले नाही. अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे. कोणत्याही परिस्थितीत त्यांची जलपर्णींची देयके देण्यात येऊ नयेत. – माई ढोरे, महापौर, पिंपरी-चिंचवड