जूनच्या अखेरीस शहरात येणाऱ्या पालख्यांसाठी धरणातील काही पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुण्यासाठी १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, सध्या तरी पुण्यात कोणतीही जादा पाणीकपात करण्यात येणार नसल्याचा पुनरुच्चार जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केला.

खडकवासला धरणातून ४ ते १७ मे या कालावधीत इंदापूर व दौंडसाठी एक टीएमसी (अब्ज घटफूट) पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले होते. हे पाणी सोडण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पुण्याला पिण्यासाठी पाणी कमी करून अधिक पाणीकपात होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत होती. त्याचप्रमाणे पालखीसाठी पाण्याच्या नियोजनाबाबतही प्रश्नचिन्ह होते.

पाण्याच्या या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना सांगितले, की पुण्यामध्ये पाण्याची कोणतीही कपात होणार नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.

शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल अशा प्रकारे पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यास आठ दिवसांत धरणातील पाण्याची पातळी वाढेल. धरणात सध्या पालखीसाठी पाणी आरक्षित ठेवण्यात आले असून, त्याशिवाय पाणी सोडण्यात येणार नाही.