जलबचतीचा पालिकेचा नारा पोकळ; गळती, जलवाहिन्या फुटण्याच्या घटना

पिंपरी : सततची पाण्याची गळती तसेच ठिकठिकाणी जलवाहिन्या फुटल्याने पिंपरी-चिंचवड  शहरात लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून यासंदर्भात महापालिकेकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने ही समस्या गंभीर बनली आहे.सोमवारी निगडीत जलवाहिनी फुटल्याने तोच प्रकार समोर आला. गळती शोधून द्या आणि पाण्याचा जपून वापर करा, असे आवाहन करणाऱ्या महापालिकेकडूनच अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने पालथ्या घडय़ावर पाणी अशी सध्याची परिस्थिती आहे.

निगडीतील मधुकर पवळे उड्डाणपुलाखालचा भाग तसेच टिळक रस्ता सोमवारी सकाळपासूनच जलमय झाला होता. उड्डाणपुलाखालून जाणारी जलवाहिनी फुटल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे वाहनस्वारांना वाहने चालवताना अडथळे येत होते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सकाळी घाईच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे नागरिकही संभ्रमात पडले होते. काही वेळानंतर रस्ते निसरडे झाल्याचे दिसून येत होते. उशिरापर्यंत दुरूस्तीचे काम सुरू होते.

गेल्या आठवडय़ात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील जलवाहिनी फुटली होती. पाच दिवस पाणी वाहतच होते. मात्र, त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय सर्वानी उघडय़ा डोळ्याने पाहिला. काही दिवसांपूर्वी,  याच रुग्णालयात पिण्याचे पाणी नाही  म्हणून रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल झाले होते. सांगवीत महाराष्ट्र बँकेशेजारी जलवाहिनी फुटल्याने रस्ता जलमय होण्याचा प्रकार अलीकडेच घडला. थेरगाव येथे जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर उंचच्या उंच पाण्याचे फवारे उडत होते. बराच काळ कोणी त्याकडे लक्ष दिले नाही. दापोडी-फुगेवाडीत महामार्गालगत रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसात हे प्रकार घडले. मात्र, पाणीपुरवठा विभागाचे त्याकडे बिलकूल लक्ष नाही. दरवेळी वेगवेगळ्या भागात जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार सुरू असून त्याद्वारे लाखो लीटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. पाण्याचा जपून वापर करा, गळती आढळून आल्यास कळवा, असे आवाहन महापालिकेकडून सातत्याने केले जाते. प्रत्यक्षात, पालिकेच्या दुर्लक्षामुळेच लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात रस्तेविकासाची तसेच सांडपाणी व्यवस्थापनाअंतर्गत कामे सुरू आहेत. अमृत योजनेअंर्तगत काही कामे आहेत. त्यामुळे काही ठिकाणी इकडचे तिकडे होते आणि जलवाहिन्या फुटण्याचा प्रकार होतो. यासंदर्भात अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेचे दुर्लक्ष होते, असे म्हणता येणार नाही.

– रामदास तांबे, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

निगडीतील पाणीपुरवठा जलवाहिनी फुटली, त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. 

प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता