सीमाभिंती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर साठवणूक टाक्यांच्या कामांना तात्पुरती स्थगिती
महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विविध कामे रखडल्यामुळे या कामांना गती देण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू करण्यात आला आहे. मात्र साठवणूक टाक्यांच्या बांधणीसाठी खोदाई करताना काही दुर्घटना घडू नये यासाठी तीन ठिकाणची कामे खबरदारीचा उपाय म्हणून थांबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वडगांव बुद्रुक येथील दोन आणि कळस येथील एक अशा तीन ठिकाणच्या कामांना सध्या स्थगिती देण्यात आली आहे. खोलवर करावी लागणारी खोदाई आणि काळी भुसभुशीत माती यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्यामुळे ही कामे थांबविण्यात आली असून पावसाळा संपल्यानंतर ही कामे सुरू करण्यात येणार आहेत.
शहराला समन्यायी पद्धतीने चोवीस तास अखंड पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. याअंतर्गत मोठय़ा क्षमतेच्या पाण्याच्या साठवणूक टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे. मात्र या योजनेतील कामे रखडल्यामुळे खासदार गिरीश बापट यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. रखडलेल्या कामांवर त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या कामांना गती देण्यात आली आहे. मात्र कोंढवा आणि आंबेगाव बुद्रुक येथील सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेने सावध पवित्रा घेतला आहे.
वडगाव बुद्रुक येथे दोन पाण्याच्या साठवणूक टाक्या बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही टाक्यांची क्षमता प्रत्येकी पंचवीस लाख महापालिकेचा सावध पवित्रा लिटर असून कळस येथील एक टाकी दहा लाख लिटर क्षमतेची आहे. टाक्यांची बांधणी करण्यासाठी खोलवर खोदाई करावी लागणार आहे. मात्र भुसभुशीत जमिनीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तूर्तास ही कामे थांबविण्यात आली आहेत, असे समान पाणीपुरवठा योजनेचे अधीक्षक अभियंता नंदकुमार जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, अन्य ठिकाणची कामे वेगात सुरू करण्यात आली आहेत. साठवणूक टाक्यांच्या उभारणीचे काम एल अॅण्ड टी या कंपनीला देण्यात आले आहे. बापट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर कंपनीला कामे वेगात करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीकडून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले असून सध्या विविध ठिकाणचे जवळपास ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात ८२ साठवणूक टाक्यांची बांधणी करण्यात येणार आहे. त्यापैकी ३० टाक्यांचे काम संथ गतीने सुरू असल्याची बाब उघडकीस आली होती. साठवणूक टाक्यांच्या उभारणीसाठी काही ठिकाणी भूसंपादनाचाही अडथळा आहे. महापालिकेने सप्टेंबर २०१६ मध्ये एल अॅण्ड टी या कंपनीला टाक्यांच्या बांधणीचे काम दिले होते. साठवणूक टाक्यांच्या बांधणीसाठी २४५ कोटी रुपये खर्च होणार असून दहा लाख लिटर क्षमतेपासून ९० लाख लिटर क्षमतेपर्यंतच्या साठवणूक टाक्या बांधण्यात येणार आहेत.
तीन टप्प्पात कामे
समान पाणीपुरवठा योजना अडीच हजार कोटींची असून त्याअंतर्गत तीन टप्प्यात कामे करण्यात येणार आहेत. त्यात शहरात एक हजार ६०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्याची कामे प्रस्तावित असून पाण्याचे मीटरही बसविण्यात येणार आहेत. तसेच साठवणूक टाक्यांच्या उभारणीचीही कामे होणार आहेत. यातील जलवाहिनी टाकण्याचे कामही गेल्या काही दिवसांपर्यंत संथ गतीने सुरू होते. त्यामुळे महापालिकेकडून संबंधित कंपन्यांना नोटीस बजाविण्यात आली होती. पाण्याचे मीटर बसविण्याची कार्यवाही संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नियोजित मुदतीमध्ये योजनेतील कामे पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.
First Published on July 23, 2019 2:24 am