पुण्यात गेल्या वर्षी धरणांमधील पाणीसाठय़ाची अवस्था बरी नव्हती. या वर्षी तर त्याहून बिकट अवस्था असून, गेल्या वर्षांच्या तुलनेत अर्धा अब्ज घनफूट (टीएमसी) इतके पाणी कमी आहे. पावसाळा वेळेवर सुरू झाला तर फारशी अडचण येणार नाही. मात्र, त्याच्या आगमनाला उशीर झाला तर मात्र पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. एप्रिल अखेर पुण्याच्या धरणांमध्ये एकूण ७.६८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
पुणे शहरासाठी चार प्रमुख धरणांमधून पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यात खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणांचा समावेश आहे. या चार धरणांपैकी टेमघर धरणाच्या उपयुक्त साठय़ात सध्या काहीही पाणी शिल्लक नाही. इतर तीन धरणांमध्ये मिळून एप्रिल महिन्याच्या अखेरीस ७.६८ टीएमसी पाणीसाठी उपलब्ध आहे. ही या वेळची स्थिती आहे. गेल्या वर्षी याच तारखेला त्यापेक्षा सुमारे अर्धा टीएमसी जास्त म्हणजे ८.१६ टीएमसी इतके पाणी शिल्लक होते. इतका पाणीसाठा असूनही गेल्या वर्षी पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागले. पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच काही दिवसांसाठी ‘दोन दिवसाआड पाणी’ ही वेळ आली.
या पाश्र्वभूमीवर पुण्यात या वर्षी पाण्याचा साठा आणखी कमी आहे. जलसंपदा विभागाच्या पुणे मंडलाच्या नियोजनानुसार, या मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात जिल्ह्य़ातील शेतीसाठी एक आवर्तन म्हणून साडेतीन टीएमसी इतके पाणी दिले जाते. मात्र, आताची स्थिती पाहता केवळ दोन टीएमसी इतकेच पाणी सोडता येईल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या वर्षी पुणे महापालिकेकडून शेतीसाठी प्रक्रिया केलेले तीन टीएमसी पाणी उपलब्ध होणार होते. पुण्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीच्या वापरायोग्य करून ते शेतीसाठी पुरविण्याची योजना आहे. याचे काम संपवून हे पाणी १ जूनपर्यंत उपलब्ध करून देण्याचे नियोजन होते. मात्र, त्याच्या पाईपलाईनच्या कामाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे काम या वेळी तरी पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आताच्या टंचाईत भर पडणार आहे. या वर्षीचे भवितव्य पावसाच्या आगमनावर अवलंबून असेल, असेही सांगण्यात आले.
पुण्याच्या धरणांमधील साठा (टीएमसी)
खडकवासला     १.४७
पानशेत            २.५९
वरसगाव           ३.६२
टेमघर               ०.००
एकूण               ७.६८
पावसाळा लांबला तर…?
‘‘पाऊस वेळेवर सुरू झाला तर पुणे शहराच्या पाण्याबाबत काही अडचण येणार नाही. कारण उपलब्ध पाण्याचे १५ जुलैपर्यंत नियोजन आहेच. पावसाचे आगमन लांबले तर मात्र अडचण येऊ शकते. तसे झाले तर पुण्याच्या पाण्यात बचत करावी लागेल. मे महिन्याच्या अखेरीस पावसाचा सुधारित अंदाज येईल. मान्सूनचा प्रवासही सुरू झालेला असेल. त्याकडे लक्ष ठेवून आहोत.’’
– अतुल कपोले, अधीक्षक अभियंता (पुणे पाटबंधारे मंडल)