अभ्यासक्रमातील अनेक संकल्पना मुलांना बऱ्याचदा समजत नाहीत किंवा त्या संकल्पना समजावून सांगण्याची पद्धत किचकट असते. मराठी माध्यमातून एकदम सेमी इंग्रजी माध्यमात गेलेल्या विद्यार्थ्यांना याचा जास्तच त्रास होत असतो. त्यावर उपाय म्हणून अनिरूध्द पिंपळखरे यांनी या वेबसाइटची निर्मिती केली आहे.
http://www.SemiEnglish.com या वेबसाइटमध्ये अनिरूध्द यांनी रोजच्या जीवनातील संकल्पना म्हणजे ‘कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येते ?’, ‘पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू का दिसते ?’, ‘सायन्स म्हणजे नक्की काय ?’, या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे व्हिडीओजच्या माध्यमातून दिलेली आहेत. गणित, विज्ञान, इंग्रजी व्याकरण याबातचेही व्हिडीओ यात आहेत. हे सर्व व्हिडीओ मराठीत असून त्यात चित्रे, अॅनिमेशन याचा वापर करण्यात आला आहे. आवश्यक तेथे इंग्रजी शब्दही वापरण्यात आले आहेत, यामुळे मराठी माध्यमातून सेमी इंग्रजी माध्यमात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासातील संकल्पना  मराठी आणि इंग्रजीतून समजणे सोपे जाणार आहे. व्हिडीओ पाहून झाल्यानंतर लगेच इंग्रजीतून प्रश्न विचारले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांंस संकल्पना समजली आहे अथवा नाही, हे देखील लगेच समजते.
ही वेबसाइट सर्वासाठी उपयुक्त आहे. अभ्यासातील संकल्पनांसोबतच संगणक वापरासंबंधीही अतिशय सोपे व्हिडीओ यामध्ये उपलब्ध आहेत. सध्या वेबसाइटमध्ये पन्नास ते साठ व्हिडीओ उपलब्ध असून त्यात आणखी भर टाकण्यात येणार आहे.
अनिरूध्द पिंपळखरे हे आयआयटी पवईचे विद्यार्थी आहेत. त्यांनी जपानमध्ये पंधरा वर्षांचा व्यावसायिक अनुभव घेतला असून मुलांसाठी काहीतरी वेगळे करण्याच्या तळमळीतून त्यांनी या अभिनव वेबसाइटची निर्मिती केली आहे.