पिंपरी महापालिकेत प्रथमच निवडून आलेल्या एका नगरसेवकाने वेगळाच ‘विक्रम’ करत सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. स्वत:च्या कुटुंबातील एका विवाहसोहळ्याच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या प्रयत्नाबरोबरच सर्वाना खूश करण्याच्या हेतूने लग्नपत्रिकेत तब्बल ८०० नावे टाकली आहेत.
येत्या काही दिवसात एका आलिशान मंगल कार्यालयात होणाऱ्या या विवाहसोहळ्याची लग्नपत्रिका परिसरात चर्चेचा विषय ठरली, ती त्यातील ८०० नावांमुळे! त्यामध्ये ५३ नावे कुटुंबीयांची आहेत. याशिवाय, आशीर्वादासाठी ९, प्रमुख उपस्थिती ७२, स्वागतोत्सुक ४५, निमंत्रक १४, कार्यवाहक ९६, संयोजक १६२, व्यवस्थापक १८९ जणांची नावे आहेत. छोटे निमंत्रक २१ असून व्यवस्थापक म्हणून विविध संस्था, संघटना आणि मंडळांची ११५ नावे आहेत. अशाप्रकारे राजकीय, सामाजिक तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवरांची तब्बल ८०० च्या घरात नावे या निमंत्रण पत्रिकेत आहेत. यापूर्वीही शहरातील अनेक लग्नसोहळ्यांमध्ये अशाप्रकारची नामावली टाकण्यात आल्याचे वेळोवेळी आढळून आले आहे. अलीकडच्या काळात अशाप्रकारची नामावली टाकण्यात चढाओढही दिसून येते. लग्नासाठी अधिकाधिक मान्यवरांची उपस्थिती लाभावी, तसेच आपल्या संबंधातील नागरिक, मतदार, मित्र परिवार व नातेवाइकांना खूश करण्याचा प्रयत्नही यातून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.