हॉटेलमधील लग्न सोहळ्यांची संख्या वाढली; बडेजाव मिरवण्यासाठी उधळपट्टीची परंपराही कायम

पिंपरी : थाटामाटात लग्नसोहळे पार पाडण्याची परंपरा करोनानंतरच्या काळात बदलू लागली आहे. आता मंगल कार्यालयात तथा खुल्या प्रांगणात लग्न लावण्याऐवजी मर्यादित खर्चात व मोजक्या निकटवर्तीयांच्या उपस्थितीत हॉटेलमध्ये लग्नविधी पार पाडण्याची  मानसिकता वाढू लागली आहे. त्याचवेळी, शासकीय नियम पायदळी तुडवून बडेजाव  मिरवत कोटय़वधी खर्च करण्याचे प्रकार सुरूच आहेत.

करोनापूर्वकाळात कोटय़वधी रुपये खर्च करून लग्न सोहळे करण्याची परंपरा शहरात होती. तालेवार घराण्यांमध्ये त्यासाठी स्पर्धा असायची. लाखो रुपये भाडे आकारणाऱ्या सुसज्ज मैदानांमध्ये तथा मंगल कार्यालयांमध्ये अनेक भव्यदिव्य सोहळे शहरवासीयांनी अनुभवले आहेत. करोनानंतरच्या काळात परिस्थिती बदलली. शासनाच्या कठोर नियमांमुळे अनेकांना हौसेला मुरड घालणे भाग पडले. मोजक्या १०० नातेवाईक व निकटवर्तीयांमध्ये लग्न समारंभ पार पाडायचा असल्याने पूर्वीप्रमाणे हजारो पत्रिका छापल्या जात नाही. त्या वाटण्यासाठी महिनाभर परिश्रम घ्यावे लागत नाहीत. सजावट, वाजंत्री, मांडणी अशा अनेक गोष्टींसाठी खर्च करावा लागत होता. हॉटेलमध्ये या सर्व गोष्टी उपलब्ध होतात. परवडणाऱ्या दरात सर्व सुविधा मिळत असल्याने या पर्यायाचा अधिक वापर होऊ लागला आहे. पूर्वीच्या थाटात लाखोंची उधळपट्टी करून टिळे, साखरपुडे, लग्नसोहळे करण्याची मानसिकताही दिसून येते.

मंगल कार्यालयात होणारी लग्नांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी झालेली आहे. हॉटेलमध्ये लग्न करण्याकडे नागरिकांचा कल आहे. करोना संकटातून बाहेर पडल्यानंतर पूर्वीप्रमाणे व्यवसायाचे दिवस येतील, याविषयी आशावादी आहोत.

कैलास आहेर, आहेर गार्डन, चिंचवड

मंगल कार्यालयांमध्ये जास्त खर्च होतो. त्या तुलनेत हॉटेलमध्ये कमी खर्चात अधिक चांगल्या प्रकारे सुविधा प्राप्त होतात. त्यामुळे हॉटेलमधील लग्नसोहळ्यांची संख्या वाढली आहे.

कैलास गावडे, निवेदक

हॉटेलमधील सभागृहात लग्नसोहळे होण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी, वाढदिवस, बारसे आदींसाठी कार्यक्रम होत होते. आता प्रामुख्याने लग्नांचे सोहळेच होतात. हॉटेलमध्ये असणारी स्वच्छता, सुसज्ज यंत्रणा, आरोग्यविषयक सुविधा, वाहनतळ आणि ताटानुसार भाडेआकारणी यामुळे कुटुंबीयांचा हॉटेलकडे कल वाढतो आहे. ३५ ते ७० हजारात लग्नसोहळा चांगल्या प्रकारे होतो. लाखात अतिशय देखणा सोहळा होऊ शकतो, हे सर्वाच्या लक्षात आले आहे. 

अमित बाबर, हॉटेलचालक  (बर्ड व्हॅली ग्रुप)