शाळांमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करण्यात आलेली प्रवेश प्रक्रिया अनधिकृत ठरवण्याच्या निर्णयामुळे पालकांचे धाबे दणाणले आहे. मुंबई-पुण्यातील काही शाळांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्यामुळे आता घेतलेल्या प्रवेशाचे काय होणार? असा प्रश्न पालक वर्गाला सतावत आहे.
नियमाचा भंग करून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या शाळांची प्रवेश प्रक्रिया अनधिकृत ठरवण्यात येईल असा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी गुरुवारी जाहीर केला होता. शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि बोर्डाच्या शाळांची प्रवेश प्रक्रिया एकत्र होणे अपेक्षित आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्येच शाळा प्रवेश प्रक्रिया उरकून घेत असल्यामुळे २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशप्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे सातत्याने येत होती. या पाश्र्वभूमीवर हा निर्णय शिक्षण विभागाने घेतला खरा मात्र, त्याच्या अंमलबजावणीबाबत आता नवे प्रश्न समोर आले आहेत.
मुंबई-पुण्यातील अनेक शाळांमध्ये दिवाळीची सुट्टी संपतानाच केजीच्या वर्गाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे पालकांचे धाबे दणाणले आहे. एक दिवसाची रजा काढून, मुलाखती, परीक्षा देऊन आणि लाखभर शुल्क भरून घेतलेले प्रवेश अनधिकृत ठरणार या कल्पनेने पालक वर्गाची झोप उडाली आहे.
याबाबत मुंबई येथील देविका पाटील यांनी सांगितले, ‘‘आयसीएससी बोर्डाच्या शाळेमध्ये मुलाला केजीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतला आहे. गेल्याच आठवडय़ामध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, आता शिक्षण विभागाने हे प्रवेश रद्द केले, तर सर्व प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागणार आहे.’’
शाळांना नोव्हेंबरमध्ये प्रवेश प्रक्रिया न करण्याच्या सूचना गेल्या वर्षीही देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही या वर्षी आपलाच हेका चालवणाऱ्या शाळा आणि उशिरा जाग येणारा शालेय शिक्षण विभाग यांमध्ये पालक भरडले जात आहेत. ‘प्रवेश प्रक्रिया झाली असल्याच्या तक्रारी किंवा सूचना अजून शिक्षण विभागाकडे आलेल्या नाहीत. मात्र, ज्या शाळांच्या प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहेत, त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल. अशा शाळांची माहिती शिक्षण विभागाला द्यावी.’ असे शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.