ससून आणि भारती रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या या आठवडय़ात रुग्णांच्या नातेवाइकांनी केलेल्या हल्ल्यांनंतर डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ससून सवरेपचार रुग्णालयात २०१३-१४ मध्ये तीन प्रकरणांमध्ये रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण केली आहे, तर ‘भारती’मध्ये गेल्या अवघ्या तीन महिन्यांत दोन वेळा असे मारहाणीचे प्रकार घडले आहेत. संतापाच्या भरात डॉक्टरांवर हात उचलणाऱ्या नातेवाइकांपासून आणि ही संधी साधून आपलेही हात साफ करून घेणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांपासून डॉक्टरांना सुरक्षा कोण दोणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
रविवारी सकाळी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर चिडलेल्या नातेवाइकांनी ‘उपचार व्यवस्थित केले नाहीत,’ असे म्हणत डॉक्टरला मारहाण केली होती. भारतीमध्ये घडलेल्या प्रकरणात रुग्णाचा मृतदेह ताब्यात मिळायला वेळ लागत असल्यामुळे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात झालेल्या वादाची परिणती मारहाणीत झाली. या प्रकरणात स्थानिक नगरसेवक व त्याचे कार्यकर्तेही नातेवाइकांच्या बाजूने सहभागी झाले होते.

‘ससूनमध्ये प्रवेश करणाऱ्यांवर
लक्ष ठेवणारी यंत्रणा हवी’
‘मार्ड’ या निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितले, ‘‘गेल्या व या वर्षी ससूनमध्ये तीन वेळा डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. याबाबत निवासी डॉक्टरांनी बी. जे.चे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना लेखी निवेदनही दिले आहे. ससूनमध्ये हे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात एक पोलीस चौकी असावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. रुग्णालयात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवणारी यंत्रणा असणे आणि रुग्णालयाच्या आत एका वेळी दोनपेक्षा अधिक नातेवाइकांना प्रवेश न देणेही गरजेचे आहे. रुग्णालय परिसरातील सुरक्षा रक्षकांची संख्या पुरेशी असावी व हे रक्षक असे प्रसंग हाताळण्यासाठी सक्षम असावेत.’’ गेल्याच महिन्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना वाहनतळ कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण झाली होती. बी. जे. आणि ससूनमध्ये मिळून कामाच्या एका पाळीत केवळ १५ ते १८ सुरक्षा रक्षक असल्याचे व कित्येक महत्त्वाच्या ठिकाणी तर ते नसल्याचेच या वेळी समोर आले होते. बी.जे.चे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्याशी वारंवार संपर्क साधल्यावरही संपर्क होऊ शकला नाही.
‘रुग्णालयातील मामा आणि मावशींवरही हल्ले होतात’
‘भारती’च्या निवासी डॉक्टरांनी सांगितले की, ‘दर १० ते १५ दिवसांनी रुग्णालयातील मामा किंवा मावशी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न होतो. परंतु ते तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. गेल्या तीन महिन्यांत डॉक्टरांवर दोन वेळा हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. रुग्णालय प्रशासनाने अशा वेळी डॉक्टरांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. डॉक्टरांची सुरक्षा आणि रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणाही सक्षम हवी.’ सुरक्षेच्या मुद्दय़ावर भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. विवेक सावजी म्हणाले, ‘‘मारहाण प्रकरणानंतर रुग्णालयातील सुरक्षा वाढवली असून रुग्णालय परिसरात गस्त घालण्यासाठी कात्रज पोलिस ठाण्यात पत्र दिले आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची मानसिक स्थिती समजून घेऊन डॉक्टरांनीही शांततेने प्रसंग हाताळावा, असेही आम्ही डॉक्टरांना सांगतो.’’