कलाकाराची भुमिका वेगळी असते, त्याने आपल्या कलेवरच लक्ष केंद्रीत करावे. राजा काय करतो आणि प्रजा काय करते, असे फालतू प्रश्न कलाकार आणि साहित्यिकांनी विचारु नयेत असा सल्ला भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पुनम महाजन यांनी आज पुण्यात बोलताना दिला. सारसबागेत युवा संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

महाजन या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्त पुण्यातील सारसबागेत युवा संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तरुणाईशी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीस ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमिताने राज ठाकरेंनी त्यांची पुण्यात जाहीर मुलाखत घेतली होती. या मुलाखतीचा संदर्भ देताना इंजिन देखील घडयाळ्याच्या ठोक्यावर चालते हे पुण्यातील मुलाखतीवरून दिसून आले, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली.

दरम्यान, जालन्यातील एका तरुणाने कलाकारासाठी काय योजना आहेत. त्याची कला घरापुरती राहणार का? असा प्रश्न महाजन यांना विचारला. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी कलाकाराने आपल्या कलेवरच लक्ष केंद्रीत करावे. राजा काय करतो आणि प्रजा काय करते, असे फालतू प्रश्न विचारु नयेत असा सल्ला दिला.

सध्याच्या तरुणाईचा एका बाजूला रोजगाराचा प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला पक्षाकडून पकोडा विकण्याच्या सल्ला दिला जातो. असा प्रश्न एका तरुणाने विचारला त्यावर त्या म्हणाल्या, पकोडा विकण्याच्या विधानावर विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर राजकारण केले. काँग्रेसने त्यासाठी दिवसभरात विविध स्टेशनवर पकोडा विक्री केली आणि एक आगळा वेगळा विक्रम करीत मोठी कमाई केली, असे सांगत काँग्रेसला सुनावले.