राहुल खळदकर

मोसमी पाऊस देशातून माघारी फिरला असला तरी अवेळी सुरू असलेल्या पावसामुळे तसेच दमट हवामानामुळे गव्हाच्या टिकवण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे गव्हाला कीड लागण्याचे प्रमाण वाढले असून व्यापाऱ्यांकडून गव्हाची खरेदी तूर्त हात राखून के ली जात असल्याचे चित्र सध्या बाजारात पाहायला मिळत आहे.

एकीकडे व्यापाऱ्यांकडून गव्हाची खरेदी कमी प्रमाणात केली जात आहे, तर ग्राहकांकडून मात्र गव्हाला नेहमीच्या तुलनेत थोडी अधिक मागणी आहे. ग्राहकांकडून मागणी असल्याने गेल्या पंधरा दिवसांत गव्हाच्या दरात प्रतवारीनुसार क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांपर्यंत वाढ झाल्याची माहिती येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड भुसार बाजारातील व्यापारी आणि दी पूना र्मचट्स चेंबरचे सचिव विजय मुथा यांनी दिली. गुलटेकडी मार्केटयार्डातील भुसार बाजारात सध्या गव्हाची दररोज ३० ट्रक आवक होत आहे. महाराष्ट्रासह पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून गव्हाची आवक होत असल्याचे मुथा यांनी सांगितले.

सध्या बाजारात विक्रीसाठी जो गहू विविध राज्यातून पाठविण्यात येत आहे त्या गव्हाच्या उत्पादनाला आठ ते नऊ महिन्यांच्या कालावधी उलटला आहे. पुण्यासह राज्यात अवेळी पाऊस पडत असल्याने हवेत गारवा असून दुपारी उकाडा जाणवत आहे. बाजारात पुरेसा गहू उपलब्ध असून मागणीही चांगली आहे. मात्र, वातावरणातील बदलाचा फटका गव्हाच्या टिकवण क्षमतेला बसला आहे. गव्हाला कीड लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून हात राखूनच गहू खरेदी केला जात आहे. ग्राहकांना चांगला गहू मिळावा म्हणून व्यापारी वर्गाकडून मागणीचा विचार करून गहू मागविला जात असल्याचे मुथा यांनी सांगितले.

साठा मुबलक

राज्यासह अन्य गहू उत्पादक राज्यात गव्हाचे उत्पादन चांगले झाले असून साठाही मुबलक आहे. राज्यासह परराज्यात गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत. यंदा गव्हाचे उत्पादन घेणाऱ्या राज्यात पाऊस चांगला झाला आहे. निसर्गाने साथ दिल्यास पुढील हंगामातील गव्हाचे उत्पादन जास्त तसेच चांगल्या दर्जाचे राहील. मात्र, नवीन गहू बाजारात विक्रीस येईपर्यंत सध्या जो गहू उपलब्ध आहे त्या गव्हाच्या दरात वाढ होत राहील, अशी माहिती विजय मुथा यांनी दिली.

घाऊक बाजारातील गव्हाचे क्विंटलचे दर

* गुजरात लोकवन- २८०० ते ३३०० रुपये

* मध्यप्रदेश लोकवन- २५०० ते ३२०० रुपये

* सिहोरी- ४००० ते ४३०० रुपये

* महाराष्ट्र लोकवन- २७०० ते ३००० रुपये

* मिल क्वालिटी- २२५० ते २३०० रुपये