कोणतीही योजना राबवायची असेल तर त्यासाठीचा प्रत्येक प्रस्ताव सहीसाठी दिल्लीला का पाठवावा लागतो, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात केला.
मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनच्या (एमबीव्हीए) नवीन कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभाच्या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रत्येक प्रस्ताव केंद्र सरकारकडे सहीसाठी का पाठवावा लागतो, असा प्रश्न विचारत, ‘काही विकासकामांच्या बाबतीत राज्य तसेच जिल्हा पातळीवर अधिकार दिले पाहिजेत. त्यासाठी नियम ठरवा, अशी सूचनाही त्यांनी केली.
पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीची जागा काही ना काही कारणाने मिळण्यास उशीर होतो आहे, पण ती शोधण्याचा प्रयत्न चालू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. बांधकाम क्षेत्राबद्दल बोलताना ते म्हणाले, या क्षेत्रामध्ये सुमारे २२,५०० कोटींची उलाढाल होते. या क्षेत्राने मोठय़ा प्रमाणात रोजगाराच्या संधीही उपलब्ध करुन दिल्या आहेत. बांधकाम करताना कोणतीही बनवाबनवी झाली नाही पाहिजे. नीट बांधकाम झाले नाही तर इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळतात, त्यामुळे बांधकाम करताना तडजोड करू नका,’ अशी विनंती त्यांनी उपस्थित बांधकाम व्यावसायिकांना केली.
बांधकाम क्षेत्राला जलद बांधकाम परवानगीसाठी एक खिडकी योजना, एफएसआय, एनव्हायर्नमेंट क्लिअरन्स, टीडीआर, डेव्हलपमेन्ट टीडीआर, झोपडपट्टी पुनर्वसनातील अडचणी, गृहप्रकल्पात २० टक्के घरे गरिबांसाठी राखून ठेवण्यासंबंधीचे धोरण अशा प्रश्नांवर संबंधित अधिकारी व एमबीव्हीए यांच्यात चर्चा घडवून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या निर्णयानंतर आपण स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर अंतिम तोडगा काढणार असल्याचेही ते म्हणाले. या प्रसंगी सुनेत्रा पवार, संस्थेचे अध्यक्ष सुधीर दरोडे, उपाध्यक्ष कल्याण तावरे, गजेंद्र पवार, जितेंद्र सावंत यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

‘माणसांसाठी घरे बांधा, पक्ष्यांसाठी नको’
‘पक्ष्यांसाठी घरे बांधून त्यांना वाईट सवयी लाऊ नका. त्यांना जर घरे बांधून दिली तर पक्षी घरटे बांधायला विसरतील. त्यांना घरटी बांधता येतील अशी वातावरण निर्मिती करा पण त्यांना घरे देऊ नका,’ अशी सूचना अजित पवार यांनी बांधकाम व्यावसायिकांना केली. केड्राईतर्फे पक्ष्यांसाठी लाकडी घरे बांधण्यात आली होती. त्या पाश्र्वभूमीवर त्यांनी ही सूचना केली.

 मालक नव्हे, सेवक आहात हे लक्षात ठेवा!
 ‘लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारले तर त्यांना व्यवस्थित माहिती द्या. तुम्ही लोकांचे मालक नाही सेवक आहात, हे लक्षात घ्या,’ अशी तंबी अजित पवार यांनी प्रसासकीय अधिकाऱ्यांना दिली.
पुण्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्या वळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी अधिकाऱ्यांकडे काही माहिती विचारली होती, त्यांना ती नीट माहिती मिळाली नाही. हा प्रश्न उपस्थित होताच, अजितदादा यांनी अधिकाऱ्यांना, योग्य प्रकारे माहिती देण्याबाबत समज दिली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांची गुणवत्ता टाटा इन्स्टिटय़ूट, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि गोखले अर्थशास्त्र संस्था यांच्याकडून तपासून घेण्याच्या सूचनाही त्यांनी केली.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
या बैठकीला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार वल्लभ बेनके, आमदार गिरीश बापट, विजय शिवतारे, लक्ष्मण जगताप, माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते.