पुलवामा येथे झालेला हल्ला हा देशावरचा आघात होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी गैरहजर का होते? त्यांनी धुळे आणि यवतमाळला येऊन आमच्यावर टीका करण्यात धन्यता का मानली? असे प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुण्यात उपस्थित केले आहेत. आरोपांच्या फैरी झाडणं हे इतकं महत्त्वाचं होतं का? गुप्तचर यंत्रणांनी हल्ल्यासंदर्भातला इशारा दिला होता तरीही उपाययोजना झाली नाही. तसेच सर्वपक्षीय बैठकीला भाजपाचे लोकप्रतिनिधीही हजर नव्हते. फक्त गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मात्र याचा आम्ही वाद निर्माण करणार नाही. देशाच्या ऐक्यासाठी एकत्र येऊन काम करू असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये युद्धाचं वातावरण तयार होणं हे दोन्ही देशांसाठी चांगलं नाही असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. लष्करानं जे आव्हान दिलं आहे त्याचा फायदा पाकिस्तान घेऊ शकतो अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2019 9:46 pm