केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अभियानात पुण्याची निवड केल्यामुळे सध्या शहरात स्मार्ट सिटीचा बोलबाला सुरू असला, तरी अनेक पायाभूत सुविधांबरोबरच शहरातील वाय फाय सेवेच्या वेगाचे काय अशा प्रश्न या क्षेत्राकडून विचारण्यात आला आहे. महापालिकेने शहरात वाय फाय सुविधा देण्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून प्रस्तावही मागवले होते आणि अतिशय कमी क्षमतेची वाय फाय सुविधा घेण्याची प्रक्रिया का अवलंबली जात आहे, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
स्मार्ट सिटी अभियानाच्या माध्यमातून शहरवासीयांसाठी स्मार्ट सेवा देण्याची चर्चा सध्या महापालिकेत आहे. तशा योजना आखल्या जात असून, संगणकीकरणाच्या माध्यमातून नागरिकांना जलद व पारदर्शी सेवा देण्याचे नियोजन केले जात आहे. या योजना आखल्या जात असतानाच वाय फाय सुविधेबाबत मात्र महापालिकेने अवलंबलेले धोरण टीकेचा विषय ठरले आहे. वाय फाय सेवा हा स्मार्ट सिटीमधील सेवेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या योजनेसाठी महापालिकेने इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले होते. इतर स्मार्ट सिटीमधील वाय फायचा वेग तीन ते बारा एमबीपीएसपेक्षाही जास्त आहे. असे असताना पुणे महापालिकेने वाय सुविधेबाबत जे नियोजन केले आहे ते ५१२ केबीपीएस इतका कमी वेग देणाऱ्या यंत्रणेचे आहे. अशा अत्यंत कमी वेग देणाऱ्या सुविधेचे नियोजन कशासाठी केले जात आहे, अशी विचारणा सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. तसे पत्रही त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.
सध्या भारतातील छोटी शहरेसुद्धा फोरजी वायफाय सुविधा उपलब्ध करून देत आहेत. या पाश्र्वभूमीवर माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्वाचे शहर म्हणून ओळख प्राप्त झालेल्या पुण्यासारख्या शहरात ५१२ केबीपीएस इतका कमी वेग असलेली वाय फाय यंत्रणा सुरू करणे कितपत योग्य आहे. मुळातच या यंत्रणेची जेवढी क्षमता दाखवली जाते त्यापेक्षा कितीतरी कमी वेग प्रत्यक्षात मिळतो. त्यामुळे महापालिकेने जो वेग प्रस्तावित केला आहे त्यापेक्षा कमी वेग मिळणार. त्यामुळे जगातील सर्व स्मार्ट सिटींचा अभ्यास करून तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून, त्यांचा सल्ला घेऊन पुणे शहरासाठी कमाल वेग असणारी वाय फाय सुविधा देणारी यंत्रणा उभी केली जावी, अशीही मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

वाय फाय सुविधा घेण्याच्या दृष्टीने महापालिकेने इच्छुकांकडून तूर्त प्रस्ताव मागवले आहेत. मात्र ते मागवतानाच ५१२ केबीपीएस एवढय़ाच वेगाची अपेक्षा धरली आहे. पुणे आयटी हब म्हणून ओळखले जात असताना मुळातच चार ते बारा एमबीपीएस वेगाचा प्रस्ताव का मागवण्यात आला नाही, हा प्रश्न आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर पुन्हा कमी वेगाबद्दल तक्रारी होणार आणि नंतर पुन्हा अधिक वेगासाठी प्रयत्न करावे लागणार. त्या ऐवजी सुरुवातीलाच चांगले नियोजन केले जावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

विजय कुंभार, अध्यक्ष, सुराज्य संघर्ष समिती