शहराबाहेरच्या मोकळ्या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांचा भरधाव वेग आणि वाहनांचे डोळे दिपतील असे प्रखर दिवे ‘त्यां’च्यासाठी जीवघेणे ठरत आहेत. पुणे- सोलापूर महामार्ग, ताम्हिणी घाट, इंदापूर- बारामती हे रस्ते वन्य प्राण्यांसाठी घातक ठरत आहेत. गेल्या तीन वर्षांत पुण्याच्या आसपासच्या मोकळ्या रस्त्यांवर ४६ वन्य प्राण्यांना भरधाव वाहनांची धडक  बसून जीव गमवावा लागला आहे.
वाहनांच्या धडकेमुळे मारल्या गेलेल्या प्राण्यांमध्ये चिंकारा, काळवीट आणि लांडग्यांचे प्रमाण अधिक आहे. त्याखालोखाल सांबर, मोर, तरस, बिबटय़ा हे प्राणी देखील मारले गेले आहेत. मारल्या गेलेल्या सापांची तर गणतीच नाही. सापांमध्ये ‘पायथन’ (अजगर) सर्वाधिक मारले जात आहेत. पुणे विभागाचे उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१२ मध्ये वाहनांची धडक बसून १५ वन्यप्राणी मारले गेले होते. २०१३ साली ही संख्या २० झाली. तर चालू वर्षी आतार्पय ११ वन्य प्राण्यांचा वाहनांच्या धडकेने मृत्यू झाला आहे. पुणे- सोलापूर महामार्ग, कदबनवाडी, इंदापूर- बारामती रस्ता, माळेगाव रस्ता, बारामती- दौंड रस्ता, मोरगाव रस्ता, खानापूर- पानशेत रस्ता या ठिकाणी वन्यप्राण्यांना भरधाव वाहनाने उडवण्याच्या घटना सर्वाधिक घडत असल्याचे दिसून येते. पुणे- मुंबई- एक्स्प्रेस महामार्गावरही अपवादाने अशी एखादी घटना घडत आहे. गुजर म्हणाले, ‘‘वाहनांमुळे मारल्या गेलेल्या प्रत्येक प्राण्याबद्दल वन विभागाला माहिती कळवली जातेच असे नाही. मारल्या जाणाऱ्या प्राण्यांची संख्या याहून अधिक असण्याची शक्यता आहे. शहराबाहेरील लहान रस्त्यांवरही वाहने वेगात जात असून या रस्त्यांवरही धडकेमुळे वन्य प्राणी मारले जाऊ शकतात. पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडणारे प्राणी, गाडय़ांचे प्रखर दिवे डोळ्यांवर पडल्यामुळे रस्त्यातून बाजूला न होऊ शकलेले प्राणी, उन्हाळा वाढल्यावर बिळाबाहेर पडलेले साप वाहनांमुळे मारले जातात. काहीच दिवसांपूर्वी इंदापूरजवळ एका लांडग्याचा वाहनाने उडवल्यामुळे मृत्यू झाला आहे.’’
– ताम्हिणी अभयारण्यातील रस्त्यांवर
‘रबर स्लीपर्स’चे स्पीडब्रेकर लावण्याचे प्रयत्न
ताम्हिणी अभयारण्य भागातून जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांचा वेग कमी करता यावा यासाठी रबरी स्लीपर्स लावण्यासाठी वन विभागातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात येणार आहे. गुजर म्हणाले, ‘‘रबरी स्लीपर्सच्या स्पीड ब्रेकर्ससाठी बांधकाम करण्याची गरज पडत नाही. नट- बोल्टच्या साहाय्याने हे स्पीड ब्रेकर सहजतेने बसवता येत असून नको असतील तेव्हा काढून टाकता येतात. ताम्हिणी भागात हे स्पीड ब्रेकर्स बसवण्यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधत आहोत. वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागू नये यासाठी वनातच पाणी पिण्याजोग्या जागा तयार करण्याचेही काम सुरू आहे.’’
वन्यप्राण्यांच्या वावराचा इशारा देणारे फलक चोरीला!
शहराबाहेरील रस्त्यांवर ज्या भागाच्या आसपास वन्यप्राण्यांचा वावर असतो तिथे वन विभागातर्फे वाहनांना वेग कमी करण्याची सूचना देणारे फलक लावले जातात. गेल्या वर्षी लावलेल्या पत्र्याच्या फलकांपैकी जवळपास निम्मे फलक चक्क चोरीला गेले आहेत. यापुढे पत्र्याचे फलक न लावता सहसा चोरीला जाणार नाहीत असे फलक लावण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे, असे गुजर यांनी सांगितले. ताम्हिणी भागात फलकांची संख्या वाढवणार असल्याचेही ते म्हणाले.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी