समाजात दारूला मिळत असलेली प्रतिष्ठा अतिशय घातक आहे, त्यामुळे सर्वप्रथम ही प्रतिष्ठा घालवण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. घराघरात दारूच्या बाटल्या पोहोचल्या असून पिणाऱ्यांसाठी ‘गटारी’, ‘थर्टी फर्स्ट’ सण झाले आहेत, अशी गंभीर परिस्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिशीर व्याख्यानमालेत ‘समाजातील व्यसनाधीनता’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे होते. डॉ. अवचट म्हणाले, शरीरशास्त्र आणि दुष्परिणाम माहिती असतानाही डॉक्टर दारूच्या आहारी जातात. नट-नटय़ा बेधुंद दारू पितात, ‘चवथा अंक’ सुरू झाल्यानंतर त्यांचे बरळणे पाहून पडद्यावर आदर्श म्हणून वावरणारे ते हेच का, असा प्रश्न पडतो. पोलिसांचाही अपवाद नाही. अगदी शिकले, सवरलेलेही तेच करतात. शिकलेले जास्त त्रासदायक असतात. ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणवणारे व्यसनाधीन झाल्याचे पाहून आश्चर्य वाटते. सगळ्या थरात दारूचे लोण पसरले असून परिस्थिती चिंताजनक आहे. पूर्वी वयाच्या ३० व्या वर्षांनंतर दारूडा होण्याचे वय होते, आता ते १५च्या आत आले आहे. अमली पदार्थ आले-गेले, गांजा मर्यादित राहिला, मात्र दारू सर्वव्यापी झाली. दारूच्या बाटल्या घराघरात पोहोचल्या. दारूपेक्षा तंबाखू, सिगरेटसारखी व्यसने मृत्यू समोर असतानाही सुटत नाहीत, इतकी त्याची घट्ट पकड आहे. पिणाऱ्याचे दारूमुळे नियंत्रण सुटते. तो मनुष्य आई-बापालाही किंमत देत नाही. दारूसाठी पैसे हवेत म्हणून काहीही करण्याची तयारी या मंडळींची असते. दारू पिणाऱ्या १०० पैकी २० जण व्यसनाधीन होतात. दारूमध्ये असे काय आहे. एवढे वाटोळे होत असल्याची माहिती असताना दारूचा अट्टाहास सोडवत नाही. दारूमुळे आनंद नव्हे तर पश्चात्ताप पदरी पडतो. चांगली माणसे होण्यात व्यसने अडथळा ठरतात.