सत्ता दिल्यास अनधिकृत बांधकामे व शास्तीकराचा प्रश्न १०० दिवसात सोडवू, असे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगवी येथील सभेत दिले. दिल्लीचे तख्त दिल्यानंतरही नरेंद्र मोदी महाराष्ट्रात गल्लीबोळात फिरत आहेत. िपपरीतील सभेत त्यांनी रेडझोन व एचए कंपनीच्या प्रश्नावर मौन बाळगले, याकडे लक्ष वेधले. चिंचवड येथील भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांचा खरपूस समाचार घेतानाच त्यांच्या पक्षांतरांची यथेच्छ खिल्लीही उडवली.
अजित पवार यांनी पुण्यात कोथरूडमध्ये बाबुराव चांदेरे व चिंचवडचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ सांगवीत सभा घेतली. त्यात त्यांनी स्थानिक मुद्दय़ांवर भाष्य करण्याबरोबरच मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मोदी खोटी स्वप्ने दाखवून तसेच खोटा प्रचार करून मतदारांची दिशाभूल करत आहेत. बारामतीत विकास झाला नाही व तेथे गुलामगिरी असल्याचे त्यांचे विधान याची साक्ष देते.
 सातत्याने पाठपुरावा करूनही अनधिकृत बांधकामे व शास्तीकराचा प्रश्न सुटला नाही. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. मात्र, सत्ता दिल्यास १०० दिवसात हे प्रश्न सोडवू, असे त्यांनी सांगितले. कोथरूड येथील सभेत त्यांनी एलबीटीचे खापर पृथ्वीराज चव्हाणांवर फोडले. मुख्यमंत्र्यांच्या ताठर भूमिकेमुळे एलबीटी हटविण्याचा निर्णय घेता आला नाही, असे ते म्हणाले.

———- लक्ष्मण जगताप लबाड आणि कृतघ्न

अपक्ष, राष्ट्रवादी, शेकापनंतर आता भाजपमध्ये गेलेले लक्ष्मण जगताप लबाड लांडग्याप्रमाणे आहेत. खोटं बोल पण रेटून बोल, अशी त्यांची कार्यपध्दती आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली. अनधिकृत बांधकामप्रकरणी निर्णय होत नसल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी खोटेच सांगितले. सतत पक्षांतर करत राहिल्याने त्यांच्यावर कोणाचा विश्वास राहिला नाही. राष्ट्रवादीच्या विरोधात ‘कमळाबाई’चा प्रचार केल्यास कठोर कारवाई करीन, पदे घालवीन, अशी तंबीही त्यांनी जगताप समर्थकांना दिली.
 
‘भाजपने जाहिरातबाजीसाठी
पैसा पुरविणाऱ्यांची माहिती द्यावी’

जाहिरातीच्या माध्यमातून राज्याची बदनामी करण्याचा प्रकार भाजपने केला. सातत्याने जाहिरातींचा मारा केला. या जाहिरातबाजीसाठी पैसा उद्योगपतींनी किंवा कुणी पुरवला, याची माहिती भाजपने माहिती अधिकारात द्यावी, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोथरूडच्या सभेत पुन्हा भाजपच्या जाहिरातींची खिल्ली उडवली. ते म्हणाले, जाहिराती आम्हीही केल्या, पण त्या सकारात्मक होत्या. भाजपने जाहिरातींचा मारा करीत राज्याची बदनामी केली. नकारात्मक जाहिराती नागरिकांनाही न आवडल्याने त्यांना काही जाहिराती बंद कराव्या लागल्या.