महापौरांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवकांचे आंदोलन

पिंपरी: औंध-काळेवाडी रस्त्यावरील जगताप डेअरी चौकातील उड्डाणपुलाचे भाजपने घाईत उद्घाटन केल्यानंतर काही तासांतच या पुलाचा रस्ता बंद करण्यात आला. या प्रकाराच्या निषेधार्थ महापौर माई ढोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवकांनी बुधवारी आंदोलन केले. भाजप-राष्ट्रवादीच्या श्रेयवादातून हा प्रकार घडल्याचे दिसून येते.

उद्घाटनासाठी तयार असूनही हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येत नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा राष्ट्रवादीचा आग्रह होता. मात्र, भाजपने घाईत महापौरांच्या हस्ते उद्घाटन उरकून घेतले. उद्घाटनावरून भाजप-राष्ट्रवादीचे राजकारण सुरू झाले. तेव्हा राजशिष्टाचाराचा भंग झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. तर, भाजपने त्याचे खंडन केले. उद्घाटनानंतर काही तासांतच मातीचे ढीग टाकून तसेच कृत्रिम अडथळे निर्माण करून पुलाचा रस्ता बंद करण्यात आला.

प्राधिकरणाने हा पूल बंद केल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, यासंदर्भात प्राधिकरण अधिकाऱ्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवर संशय घेत बुधवारी महापौरांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवकांनी पुलाजवळ येऊन आंदोलन केले. दोन दिवसात पुलाचा रस्ता सुरू करण्याचे आदेश महापौरांनी प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाला दिले.