मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशातून बेकायदेशीररीत्या देशी बनावटीची पिस्तुले शहरातील गुंडांना विक्री करणारे जाळे शहरात सक्रिय आहे. आतापर्यंत परप्रांतातून पुण्यात शस्त्रे आणून विक्रीसाठी पुरुषांचा वापर केला जातो. शस्त्रास्त्रांच्या तस्करीत परप्रांतातील एका महिलेला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी लष्कर भागात पकडले. तिच्याकडून तीन पिस्तुले व एकवीस काडतुसे जप्त करण्यात आली.

जेनीबाई ताना बरेला (वय ५०, रा.उमेटी, बलवाडी, बडवानी, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. जेनीबाई शुक्रवारी लष्कर भागातील अरोरा टॉवर्स इमारतीनजीक पिस्तूल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी तेथे पाळत ठेवली होती. जेनीबाई पारंपरिक वेशात लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर फिरत होती. पोलिसांनी तिच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. या कारवाईसाठी पोलिसांनी महिला पोलिसांचे साहाय्य घेतले होते. तिला पोलिसांच्या पथकाने ताब्यात

घेतले. तिने पिशवीत  तीन पिस्तुले व एकवीस काडतुसे लपविली होती. पोलिसांनी तिला पकडले आणि झडती घेतली, तेव्हा तिच्याकडील पिशवीत पिस्तुले आणि काडतुसे सापडली,अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी.आर. पाटील व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.

पिस्तूल विक्रीप्रकरणी महिलेला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असेही त्यांनी नमूद केले. दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम,  हवालदार शैलेश जगताप, संतोष पागार, राहुल घाडगे, प्रमोद गायकवाड, परवेझ शेख, जयश्री जाधव, प्रवीण जाधव यांनी ही कारवाई केली.

जेनीबाईकडून नाशिक, मुंबईत पिस्तुल विक्री

जेनीबाईचा मुलगा बेकायदेशीररीत्या शस्त्रे तयार करतो.  काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. खासगी बसने ती पुण्यात पिस्तूल विकण्यासाठी यायची. पुणे, मुंबईसह नाशिक परिसरात तिने पिस्तुलांची विक्री केली आहे. तिला पिस्तूल विक्री प्रकरणी शिक्षाही झाली होती. जेनीबाई बसस्थानकाच्या भागात पिस्तुलांची विक्री करायची. हवालदार शैलेश जगताप यांना ही माहिती मिळाली होती. त्याआधारे पथकाने तिला पकडले.  जगताप यांनी आतापर्यंत पुणे परिसरातील गुंडांकडून १५५ पिस्तुले जप्त करुन त्यांना अटक केली आहे.