पंतगासाठी वापरण्यास बंदी असलेल्या चिनी मांजाने गळा कापला गेल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अखेर मृत्यू झाला. सुवर्णा मुजूमदार असे दुर्देवी महिलेचे नाव असून बुधवारी (दि.७) सांयकाळी सहाच्या सुमारास पुणे महापालिका भवनाकडे जाणाऱ्या शिवाजी पुलावरून दुचाकीवर घरी जात होत्या. त्यावेळी मांजा गळ्याभोवती गुंडाळून गळा कापल्यामुळे गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पतंग उडविण्यासाठी अत्यंत घातक ‘नायलॉन’चा चिनी मांजा सर्रास वापरला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाची बंदी असूनही शहरातील दुकानांमध्ये सर्रास हा मांजा विकला जात आहे. या मांजामुळे अनेक किरकोळ व गंभीर अपघात होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.